Home Mumbai निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी –...

निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी – ना. ॲड. आकाशदादा फुंडकर

खामगाव | श्रीधर ढगे

खामगाव व शेगाव तालुक्यासह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असताना, राज्याचे कामगार मंत्री ना. ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे कृषी मंत्री ना. दत्ताजी भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.

 

खामगाव व शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरणी झाल्यानंतरही सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने कृषी विभागाकडे निवेदनही देण्यात आले होते. कृषी विभागाकडे आतापर्यंत सुमारे ७८ तक्रारी दाखल झाल्या असून, शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर ना. ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. दोषी बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

 

यावेळी कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती देण्यात आली. निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या या प्रकरणाकडे बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Don`t copy text!