Home Breaking News शहीद पोलिसांच्या त्यागाला सलाम! अकोल्यात १५४ वीरांना मानवंदना

शहीद पोलिसांच्या त्यागाला सलाम! अकोल्यात १५४ वीरांना मानवंदना

शहीद जवानांच्या तीन कुटुंबीयांचा कृतज्ञता स्मृतिपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात १५४ शहीद पोलीस अधिकारी व अंमलदारांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शहीद जवानांच्या तीन कुटुंबीयांचा कृतज्ञता स्मृतिपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

 

शहीदांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता

 

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्देशानुसार शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत अकोल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

यामध्ये अंबिका मुकुंदा हातोलकर, सरोज भरतसिंग ठाकूर आणि भारती राजू गायकवाड यांचा समावेश होता. त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञता स्मृतिपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या उपक्रमातून शहीद जवानांचे बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग यांची जाणीव अधोरेखित करण्यात आली. शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पोलीस दल ठामपणे उभे असल्याचा विश्वासही या माध्यमातून देण्यात आला.

 

पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्यासह एलसीबी पीआय नितीन लेव्हरकर आणि पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. उपस्थितांनी शहीदांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला अभिवादन केले.

 

२१ ऑक्टोबरचा इतिहास

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्स येथे चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दहा जवानांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो.

 

देशांतर्गत सुरक्षा, नक्षलवादविरोधी मोहिमा, दहशतवादविरोधी कारवाया आणि कायदा व सुव्यवस्था राखताना अनेक पोलीस अधिकारी व जवान शहीद झाले आहेत. त्यांचे बलिदान पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी आहे.

 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कटिबद्ध

नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. शहीद जवानांच्या शौर्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अकोला जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

शहीदांचे बलिदान अमूल्य आहे. त्यांच्या शौर्याची, त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची आठवण सदैव जिवंत राहील. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व शहीद पोलीस अधिकारी व अंमलदारांना विनम्र अभिवादन!

Don`t copy text!