Home Breaking News सुगम संगीतात आर्यन हांडे याची सुवर्णभरारी!

सुगम संगीतात आर्यन हांडे याची सुवर्णभरारी!

इंद्रधनुष्य युवक महोत्सवात प्रथम क्रमांक; प्रतिष्ठेचा ‘कलर कोट’ देऊन गौरव

 

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : संगीताची मनापासून आवड, सुरांची उत्तम जाण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर सुमित्राबाई शिरला अंधारे महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. आर्यन निलेश हांडे याने सुगम संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे १२ व १३ ऑक्टोबर रोजी आयोजित इंद्रधनुष्य युवक महोत्सवात त्याने हे उल्लेखनीय यश संपादन केले. आर्यनच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

इंद्रधनुष्य युवक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संगीत स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुगम संगीत गायनाच्या या स्पर्धेत तब्बल दहा महाविद्यालयांतील स्पर्धक सहभागी झाले होते. या चुरशीच्या स्पर्धेत आपल्या गायनकौशल्याच्या बळावर आर्यन हांडे याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, या यशाबद्दल त्याला विद्यापीठाच्या वतीने सन्मानाचे प्रतीक असलेला ‘कलर कोट’ प्रदान करून गौरविण्यात आले.

आर्यनला बालपणापासूनच संगीताची विशेष आवड आहे. गायनाची ही आवड जोपासताना त्याने केलेली मेहनत, संगीताप्रती असलेली निष्ठा आणि कलेची साधना यांचे फलित म्हणून त्याला हे यश मिळाले आहे. त्याच्या संगीतप्रवासात आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले असून, कुटुंबीयांच्या पाठबळामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे.

आर्यनचे वडील निलेश हांडे हे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. आर्यनने मिळविलेल्या या यशामुळे हांडे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या यशाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

आर्यन हा स्वर अकॅडमीचा विद्यार्थी असून, त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी अंधारे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे सर, देशमुख मॅडम आणि रोहित तळोदे सर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिद्द, मेहनत आणि कलेवरील निस्सीम प्रेम यांच्या जोरावर आर्यनने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे. सुगम संगीतात सुवर्णपदक मिळविणाऱ्या आर्यनच्या या यशामुळे त्याच्या पुढील संगीतप्रवासासाठी नवी दिशा मिळाली असून, त्याच्याकडून भविष्यातही अशाच उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Don`t copy text!