Home विदर्भ घंटागाडी सेवा ठप्प, कचऱ्याचे ढीग कायम; शुल्क वसुली मात्र जोमात ...

घंटागाडी सेवा ठप्प, कचऱ्याचे ढीग कायम; शुल्क वसुली मात्र जोमात तीन दिवसांत व्यवस्था सुरळीत करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू – निलेश देव

निलेश देव
निलेश देव

श्रीकांत पाचकवडे
अकोला : शहरातील घंटागाडी व कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरातील अनेक भागांत घंटागाडी सेवा अत्यंत अनियमित झाली आहे. चार ते सहा दिवस घंटागाडी न फिरकल्याने घराघरांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या आरोग्य धोक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी केली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कोणत्याही भागात घंटागाडीचे निश्चित वेळापत्रक नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोणत्या परिसरात घंटागाडी केव्हा येणार, याची कोणतीही माहिती दिली जात नाही. अनेक ठिकाणी सलग पाच-पाच दिवस कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना घरातच कचरा साठवून ठेवावा लागत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्वच्छतेचे दावे करणाऱ्या प्रशासनाची प्रत्यक्षात मात्र पूर्णपणे पोलखोल झाली आहे.

विशेष म्हणजे, सेवा अनियमित असतानाही स्वच्छता शुल्काची वसुली मात्र नियमितपणे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. घंटागाड्यांवर पुरेसे हेल्पर नाहीत, मनुष्यबळाची कमतरता आहे, सेवा विस्कळीत आहे; तरीही नागरिक, रुग्णालये, अपार्टमेंट्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांकडून ५०, १०० रुपये तसेच विविध ठिकाणी अधिक रकमेची आकारणी केली जात आहे. अपेक्षित सेवा न देता शुल्क वसूल करणे म्हणजे नागरिकांच्या पैशांची उघड लूट असून प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निलेश देव यांनी केला.

मागील अनेक महिन्यांपासून नवीन निविदा प्रक्रिया, तांत्रिक अडचणी, कर्मचारी कमतरता आदी कारणे पुढे करून प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे. मात्र कर आणि स्वच्छता शुल्क भरणाऱ्या नागरिकांना कारणे नव्हे, तर नियमित आणि दर्जेदार सेवा हवी आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरात कचऱ्याचे ढीग साचल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. भविष्यात शहरात कोणत्याही प्रकारची रोगराई पसरल्यास त्यास संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

निलेश देव यांनी अकोला महानगरपालिकेकडे तातडीने सर्व प्रभागांमध्ये नियमित घंटागाडी सेवा सुरू करणे, निश्चित वेळापत्रक जाहीर करणे, आवश्यक तेवढे हेल्पर व मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि मनमानी शुल्क वसुली तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. तीन दिवसांच्या आत कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन आणि सत्ताधारीच जबाबदार राहतील, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

Don`t copy text!