सौजन्य : जेष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख
खामगाव : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात पुरुष शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षकांनी अधिक मतदान करून आपली जागरूकता सिद्ध केली आहे. जिल्ह्यात पुरुष शिक्षकांचे ९०.६५ टक्के, तर महिला शिक्षकांचे ९१.०४ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ९०.७५ टक्के मतदानाची नोंद झाली असून, ८ हजार २८० शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ९ हजार १२४ मतदार असून, त्यामध्ये ६ हजार ७१३ पुरुष शिक्षक आणि २ हजार ४११ महिला शिक्षकांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला शिक्षकांची मतदारसंख्या कमी असली, तरी मतदानाच्या टक्केवारीत महिला शिक्षकांनी आघाडी घेतली.
जिल्ह्यातील नांदुरा, शेगाव, खामगाव, चिखली, सिंदखेड राजा आणि लोणार या केंद्रांवर महिला शिक्षकांच्या मतदानाची टक्केवारी अधिक असल्याचे दिसून आले. तर संग्रामपूर, मोताळा, बुलढाणा, देऊळगाव राजा आणि मेहकर या केंद्रांवर पुरुष शिक्षकांच्या मतदानाची टक्केवारी अधिक राहिली.
जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार, मोताळा केंद्रावर सर्वाधिक ९६.८७ टक्के मतदान झाले, तर लोणार केंद्रावर सर्वांत कमी ७३.१४ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूणच, शिक्षक मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग नोंदविल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
शिक्षकांपेक्षा राजकीय पुढाऱ्यांचाच पुढाकार!
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असतानाही मतदान केंद्रांच्या बाहेर शिक्षक मतदारांपेक्षा राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांचीच अधिक गर्दी दिसून आली. जणू काही शिक्षकांपेक्षा राजकीय पुढाऱ्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जवळपास सर्वच उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर आपापले बूथ उभारले होते. या बूथवर मतदारांपेक्षा राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्यातील देवकर आणि लहाने हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले होते. अमरावती जिल्ह्यानंतर सर्वाधिक शिक्षक मतदार बुलढाणा जिल्ह्यात असल्याने या जिल्ह्याकडे सर्वच उमेदवारांचे विशेष लक्ष लागले होते.

पहिल्या पसंतीच्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांचे गणित जुळविण्यासाठी उमेदवारांसह राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रत्येक उमेदवाराकडून आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष निकालानंतरच कोणाच्या पारड्यात किती मते पडली आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडली, हे स्पष्ट होणार आहे.






