वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात अल निनोच्या प्रभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गुरुवारी (३० सप्टेंबर) महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. पिकांचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा अल निनोच्या फटक्यामुळे पावसात ४५ दिवसांचा खंड पडल्याने सोयाबीनसह इतर पिके पार वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे व तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाडेगाव शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पथकाने शेतकरी गोविंद मसने यांच्या वाळलेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्या प्रसंगी ग्राममहसूल अधिकारी शैलेश इंगळे, राम लंगोटे, कृषी सहायक ऋषिकेश गव्हाळे, करण गावडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बोरकर, महसूल सेवक नारायण घाटोळ, नारायण मानकर, गोपाल शेगोकार, दिनेश धाडसे, बाळू घोटाळ, डॉ. शेख चांद यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची मागणी: अल निनोमुळे शेतातील हातातोंडाशी आलेले पीक पुरेशा प्रमाणात ऐन वेळेवर ४५ दिवस पावसात खंड पडल्याने सर्व पिक वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने सर्वच नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय भरपाई मिळवून द्यावी.अशी मागणी होत आहे.






