Home Breaking News 15 वर्षांची नवरी, 35 वर्षांचा नवरदेव : बाल संरक्षण विभागाने रोखला बालविवाह

15 वर्षांची नवरी, 35 वर्षांचा नवरदेव : बाल संरक्षण विभागाने रोखला बालविवाह

15 वर्षांची नवरी, 35 वर्षांचा नवरदेव : बाल संरक्षण विभागाने रोखला बालविवाह

नागपूर : बालविवाहांना बंदी असताना काही ठिकाणी बालविवाह करण्याचे प्रकार घडतात. सरकारने मुलगा आणि मुलीच्या लग्नासाठी नियम ठेवले आहेत. त्या नियमानुसार योग्य वयात मुलगा आणि मुलीचं लग्न होणं अपेक्षित असतं. पण काही ठिकाणी अल्पवयीन मुलींचं जास्त वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं जातं. नागपूरमध्ये अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नरखेड तालुक्यातील मालापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात १५ वर्षांची नवरी आणि ३५ वर्षांचा नवरदेव असा विवाहाचा घाट घालण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह रोखण्यात आला. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा बालविवाह करण्यात येत असल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला प्राप्त झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाईसाठी पाऊल उचलले. कोंढाळी पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका करण्यात आली. या विवाहात सहभागी असणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, असे बालसंरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नरखेड पोलिसांनी या विवाहात दोषी असलेल्यांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यांतर्गत, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

या कारवाईमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलिस निरीक्षक, जिल्हा बाल रक्षक समन्वयक तसेच चाइल्ड लाइन प्रतिनिधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुटका केलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिला पुढील काळजी आणि संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. तसेच तिच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रकरण बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आले आहे.प्रशाशनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बालविवाहाच्या घटना आढळल्यास तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे हक्क व संरक्षण सुनिश्चित करता येईल.

Don`t copy text!