अकोला | श्रीकांत पचकावडे
डाबकी रोड परिसरात प्रथमदर्शनी ‘अकस्मात मृत्यू’ वाटणाऱ्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या तीन तासांत उलगडा करत हा प्रकार खून असल्याचे निष्पन्न केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयिताच्या चौकशीच्या आधारे मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून डाबकी रोड पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेट परिसरात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. संबंधित व्यक्तीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ३७/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. मृतदेहाची पाहणी करताना शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आढळल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला.
यानंतर एलसीबीची दोन विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृत व्यक्तीला रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. तपासात सुरेश रतनलाल अग्रवाल (रा. मोहरी देवी, भारती प्लॉट, जुने शहर, अकोला) याची ओळख पटली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राजू पांडुरंग इंगळे (वय ४२, रा. फडके नगर, शिवराणा चौक, डाबकी रोड, अकोला) यांच्यासोबत पैशांच्या व्यवहारातून आणि जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची कबुली त्याने दिली.
तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि आरोपीच्या चौकशीच्या आधारे एलसीबीने अवघ्या तीन तासांत संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला. त्यानंतर आरोपीला डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण तसेच शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसीमोद्दीन, मंगेश इंगळे, श्रीकांत पातोंड आणि भीमराव दिपके यांच्या पथकाने केली.
(टीप : या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत आरोपीला कायद्याने निर्दोष मानले जाते.)






