Home Breaking News नागपूर : राज्यावर पुन्हा एकदा आस्मानी संकट

नागपूर : राज्यावर पुन्हा एकदा आस्मानी संकट

नागपूर : राज्यावर पुन्हा एकदा आस्मानी संकट

नागपूर : विदर्भात तापमानाचा पारा वाढतच असला तरी राज्यावर मात्र पुन्हा एकदा आस्मानी संकटाचे वारे घोंगावत आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यातच आज आस्मानी संकट गडद होणार आहे. विदर्भात अवकाळी पाऊस तर कोकण परिसरात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळेच राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आस्मानी संकट पुन्हा एकदा परत आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, सोमवारी, १४ एप्रिलला राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा, अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचे असणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये एकाचवेळी पाऊस, उष्णता आणि दमटपणा यांचा अनुभव येईल.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात वादळी वारे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर कोरड्या हवामानसह वादळी वाऱ्यांची देखील शक्यता आहे. पण काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Don`t copy text!