Home Breaking News रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेत

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेत

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेत

नागपूर: रेल्वेस्थानकांवर संधी मिळताच रेल्वे प्रवाशांचे किंमती साहित्य लंपास करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा रेल्वे पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पंकज शुभम रणगिरे (वय २२, रा.किरणापूर बडगाव, बालाघाट), रितेश उर्फ मोनू भरतलाल रणिगरी (वय २८, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) आणि जी. शंकर कनेशन (वय ३२, रा. मदुराई श्रीमंगलम, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हुसेनीपूर बिहार येथील गौतमकुमार रॉय (वय १९) हा तरुण कामाच्या निमित्ताने नागपुरात आला होता. गावाला जाण्यासाठी तो बुधवारी रात्री रेल्वे स्थानकावर आला. गाडीला वेळ असल्याने मध्यरात्री फलाट क्रमांक तीनवर बसला. मध्यरात्री १ च्या सुमारास त्याच्या बॅगमधून अज्ञात आरोपीने २८ हजारांचा मोबाईल लंपास केला. हे लक्षात आल्यानंतर गौतमकुमारने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. त्याची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पहाटे ३ च्या सुमारास विदिशा, मध्य प्रदेश येतील रहिवासी रंजित अहिरवार याच्या बॅगमधील मोबाईल चोरीला गेला. ही चोरीची घटना फलाट क्रमांक ८ वर घडली. अवघ्या दोन तासात दोन फलाटांवर चोरीच्या दोन सारख्या घटना घडल्याने रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही फलाटांवरच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणे सुरू केले.

पुन्हा चोरीचा प्रयत्नात असलेले आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, ते वारंवार गर्दीच्या ठिकाणी शिरत असल्याने चोरटे सापडत नव्हते. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना बरीच शोधाशोध करावी लागली. आज दुपारी रेल्वे स्थानकावर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पंकज, रितेश आणि जी. शंकर हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना ठाण्यात आणून झडती घेतली असता आज पहाटे चोरलेले दोन आणि अन्य तीन असे पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले. या टोळीत आणखी काही सदस्य असावे, असा पोलिसांना संशय असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Don`t copy text!