प्राणांतिक रस्ते अपघातांत २७ टक्क्यांनी घट; अकोला पोलीस दलाची CCTNS क्रमवारीत राज्यात प्रथम कामगिरी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जिल्ह्यात रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित पोलीसिंगच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा रस्ता सुरक्षा समितीतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भुयार, कार्यकारी अभियंता तथा समितीचे सचिव प्रसाद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुलवाल, वाहतूक निरीक्षक विलास पाटील, प्रदीप गुरुखुद्दे, शुभम थोरात, कृष्णा दायमा यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्राणांतिक अपघातांत २७ टक्क्यांची घट
अकोला जिल्ह्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. वाहतूक नियमांची अंमलबजावणी, नियोजनबद्ध कारवाई आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य दिल्यामुळे जिल्ह्यातील प्राणांतिक रस्ते अपघातांच्या संख्येत २७ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर पोलीस प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.
सण-उत्सव शांततेत; कायदा व सुव्यवस्था अबाधित
जिल्ह्यात गणेशोत्सव, कावड यात्रा, ईद यांसह विविध धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पडले. यासाठी पोलीस यंत्रणेने केलेले नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि नागरिकांशी साधलेला संवाद महत्त्वाचा ठरला. सामाजिक सलोखा कायम राखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली.
CCTNS क्रमवारीत अकोला पोलीस दल राज्यात प्रथम
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशासकीय कामकाजातील गतिमानता आणि डिजिटल प्रणालींच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून अकोला जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रातील CCTNS क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती देण्यात आली. या कामगिरीतून पोलीस दलाच्या तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धतीचे महत्त्व अधोरेखित झाले.

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळणे, सुरक्षित डिजिटल व्यवहार करणे आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार कुठे व कशी करावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
रस्ता सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, सायबर जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध क्षेत्रांतील कामगिरीची दखल घेत रस्ता सुरक्षा समितीने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सत्कार करून अभिनंदन केले. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली.





