७ ते ८ महिन्यांपासून निराधारांचे अनुदान रखडल्याचा आरोप; पूर्णाजी खोडके यांचा प्रशासनाला अल्टिमेटम!
“दसरा अंधारात गेला; आता दिवाळीही अंधारात जाऊ देणार नाही!” — १ नोव्हेंबरपर्यंत अनुदान जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा!
कुशल भगत/विशेष प्रतिनिधी
अकोट : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इतर सामाजिक सहाय्य योजनांचे अनुदान गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रखडल्याच्या तक्रारींमुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवाळी तोंडावर आली असतानाही हक्काचे अनुदान मिळत नसल्याने शेकडो लाभार्थ्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी अकोट तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत थकीत अनुदान जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा क्रांतिकारीचे युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी दिला…
एकिकडे दुष्काळ तर दुसरीकडे,वृद्ध, निराधार महिला, दिव्यांग आणि गरजू नागरिकांना औषधोपचार, किराणा तसेच दैनंदिन खर्च भागवताना अडचणी येत असल्याचे लाभार्थ्यांनी मांडले. शासनाच्या सामाजिक सहाय्य योजनांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असेल, तर प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल कधी घ्यायची..? असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला.
व्हिडिओ समोर; तरीही लाभार्थ्यांच्या अडचणी कायम?
दोन ते तीन दिवसांपूर्वी लाभार्थ्यांच्या समस्यांसंदर्भातील व्हिडिओ माध्यमांवर समोर आला होता. निराधार लाभार्थ्यांना कार्यालयाच्या चकरा मारूनही निराश होऊन परतावे लागत असल्याच्या तक्रारी कायम असल्याने संघटनेने तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलनावेळी उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने नायब तहसीलदारांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बोलावून लाभार्थ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. लाभार्थ्यांच्या समोर थेट यावेळी लेखी निवेदन देऊन थकीत अनुदान, प्रलंबित अर्ज आणि विलंबाची कारणे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली…
विशेष म्हणजे, एप्रिल २०२६ पासून दाखल केलेले अनेक अर्ज अद्याप प्रलंबित असल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज वेळेत निकाली का निघत नाहीत? अनुदान रखडण्यामागचे नेमके कारण काय? या दिरंगाईला जबाबदार कोण? असे सवाल उपस्थित करत प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची व कारवाई करण्याची मागणी करण्यात आली…
यावेळीस क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके व ,निवेदन देताना नशीमबी, अब्दुल मजिद (अकोट), जान्हवी अभोरे, अकरम खान, शंकर सनगाडे, मलाम बाई अभोरे, रुखमाबाई घुगे, रामदास कवडे, श्रीकुण मौरे, रामभाऊ नागे, दुर्गाबाई अभोरे, पंकज पाखरे आणि दिनेश जऊळकार , रामा मोरे, रमाबाई बोबडे, पाडु बोबडे,यांच्यासह शेकडो लाभार्थी उपस्थित होते… लाभार्थ्यांच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्यांना दिवाळीपूर्वी दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
“दिवाळीपूर्वी अनुदान द्या, अन्यथा क्रांतिकारी स्टाईलने आंदोलन!”
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने १ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पात्र लाभार्थ्यांचे सात ते आठ महिन्यांपासून रखडलेले अनुदान जमा करावे, एप्रिलपासून प्रलंबित असलेले पात्र अर्ज तातडीने निकाली काढावेत आणि विलंबाची चौकशी करून जबाबदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी पूर्णाजी खोडके यांनी आक्रमक भूमिका मांडताना सांगितले, “निराधारांच्या हक्काचे पैसे ही कोणाची मेहरबानी नाही, तो त्यांचा अधिकार आहे! दसरा अंधारात गेला; आता दिवाळीही अंधारात जाऊ देणार नाही. १ नोव्हेंबरपर्यंत ठोस कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांचे अनुदान जमा करावे. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या आक्रमक शैलीत क्रांतिकारी स्टाईलने आंदोलन छेडेल. दिवाळीपूर्वी अनुदान न मिळाल्यास प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य दाखवून द्यावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला…
आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन थकीत अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणार का, पात्र लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी न्याय मिळणार का, याकडे अकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे….





