ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करण्याची मागणी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : ‘एसआयआर’च्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून ‘मत चोरी’ केली जात असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
‘मतदाराचे नावच यादीतून काढणार असाल, तर मतदानाचा अधिकार कुठे राहिला?’ असा थेट सवाल करीत काँग्रेसने एसआयआर प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेतला. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसने निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदविल्याचे म्हटले आहे. एसआयआर प्रक्रिया, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणासारख्या मुद्द्यांचा त्यात समावेश असल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर एसआयआर प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पारदर्शक करावा, मतदारांची नावे वगळण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी आणि मतदार यादीतील बदलांचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
‘निवडणूक आयोगाला जाब द्यावाच लागेल’
पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार यादीच्या प्रक्रियेचा संदर्भ देत काँग्रेसने मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मतदारसंख्या व नोंदणीतील कथित अनियमिततेचे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेबाबत केलेल्या आरोपांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला.
काँग्रेसच्या मते, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता ही लोकशाहीच्या विश्वासार्हतेशी जोडलेली आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न टाळून चालणार नाहीत. एसआयआर प्रक्रियेबाबत जनतेसमोर स्पष्टता आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आयोगातील निर्णय एकमताने होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे SIRच्या मुद्द्यावरून काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न आणि आयोगाची भूमिका यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी राज्यमंत्री अजहर हुसैन, जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष महेंद्र गवई, डॉ. जिशान हुसैन, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रशांत पाचडे, मो. इरफान, कपिल रावदेव, अफसर कुरैशी, फजलू पहलवान, आकाश कवडे, कशिश खान, पूजा काळे, विजय तिवारी, सचिन शेजव, विनोद नालट, इलियास खान, मोईन खान, विजय देशमुख, अब्दुल कलाम, सुवर्णा रेखा जाधव, जया गेडाम, निलोफर खान, सुषमा मोरे, विजया खंडारे, हुसेन चौधरी, अभिलाष तायडे, राहुल सारवान, गणेश कळस्कर, विनोद मराठे, आसिफ खान, रहमान बाबू, शेख मुख्तार, सोहेल खान पठाण, प्रशांत देशमुख, पराग कांबळे, अभिजीत तवर, अंकुश तायडे, प्रशांत वानखडे, अन्नपूर्णेश पाटील, वर्षा गिरी, रेखा डोंगरे, दीक्षा चावरे, सीमा चावरे, शेख नावेद, डॉ. प्रमोद चौरे, सारंग मालानी, मोहसीन शाह, पद्माकर वासनिक, आकिब खान, सय्यद सोहेल, विशाल राठोड, योगेश थोरात, मो. युसुफ, श्रीकृष्ण चोरे, जयराम सोनोने, सैय्यद अहमद, शेख अब्दुल्ला, सोनू पठाण, फैसल खान, मुजीब सरकार, राजू पाटील जोगदंड, सुनील वानखडे, दीपक गवई, मो. शारिक, नागेश बागडे, अभिमान नितोने, चंद्रशेखर नकाशे, वैभव मानकर, वसीम खान, मंजूर अहमद आदी उपस्थित होते.
‘१४ आक्षेपां’नी वाढवली चिंता

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी दहा महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे. एसआयआर, मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी आणि आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणाशी संबंधित बाबींचा त्यात समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र, निवडणूक आयोगाने निर्णय एकमताने होत असल्याचे स्पष्ट केले आहे.






