अकोला जिल्ह्यात ट्रिगर १ लागू; जिल्हाधिका-यांकडून आढावा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांत ट्रिगर १ (प्रथम कळ) नुसार विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांच्या नुकसानाची तपशीलवार नोंद घेऊन चार दिवसांत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राबवावयाच्या उपाययोजना, शासन निर्देश, सवलतींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, जिल्हा कृषीविकास अधिकारी तुषार जाधव हे बैठक कक्षात, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते.
पंचनामे तपशीलवार व सविस्तर करावेत. प्रत्येक नुकसानाची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. सातही तालुक्यातील शेतीपिके, फळपीके नुकसानाचे क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल अ, ब, क, ड सादर करावा. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच, शेतकरी यांच्या उपस्थितीत तातडीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
शेतक-याची माहिती बँक खात्याचे तपशील, फोन क्रमांक असे तपशीलही बिनचूकपणे नोंदवले गेल्याची खातरजमा करावी. सर्व तहसीलदारांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडे अहवाल सादर करावा व कृषी अधिक्षकांनी संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल वेळेत सादर करावा. रोज झालेल्या पंचनाम्यांची माहिती गुगलशीटवर नमूद करावी. याविषयी दिलेल्या सूचना व निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे. हयगय किंवा विलंब होता कामा नये. सर्वांनी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
दुष्काळग्रस्त भागासाठी लागू सवलतींचा आदेश
जिल्हाधिका-यांनी जारी केला. जमीन महसूलात तूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजदेयकात सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त काम सुरू करणे, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर आश्रित शेतकरी, मजूर आदी यांना अन्नधान्याची टंचाई होणार नाही याची व्यवस्था उभी करणे, जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याची पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे आदी कार्यवाही संबंधित विभागांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.






