श्रीधर ढगे पाटील
मुंबई : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेच्या वेळापत्रकात निवडणूक आयोगाने बदल केला आहे. पूर्वी दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र सुधारित वेळापत्रकानुसार ही मुदत आता १२ ऑक्टोबर २०२६पर्यंत वाढवण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीखही पुढे ढकलण्यात आली असून आता १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
दोन कोटी मतदारांची संख्या कमी झाल्याने चर्चेला उधाण
SIR अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत पूर्वीच्या मतदार यादीच्या तुलनेत मोठी घट दिसून आली होती. जूनपर्यंतच्या मतदार यादीत महाराष्ट्रात सुमारे ९.७८ कोटी मतदार होते, तर प्रारूप SIR यादीत सुमारे ७.७२ कोटी मतदारांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदारांनी आपले नाव प्रारूप यादीत आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरले आहे.
नाव न दिसणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे नाव कायमचे मतदार यादीतून वगळले गेले आहे, असा थेट अर्थ होत नाही. SIR प्रक्रियेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदींसह विविध कारणांमुळे काही नोंदी प्रारूप यादीत समाविष्ट झालेल्या नाहीत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित मतदारांना दावे किंवा हरकती दाखल करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे.
आता १२ ऑक्टोबरपर्यंत काय करता येणार?
मतदारांनी सर्वप्रथम SIR-2026 च्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव आढळत नसल्यास किंवा मतदार नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित निवडणूक यंत्रणेकडे आवश्यक दावा किंवा हरकत दाखल करता येईल.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर SIR-2026 साठी नाव शोधण्याची सुविधा, ASDD यादी, आवश्यक कागदपत्रांची माहिती, हेल्पडेस्क आणि SIR संदर्भातील सूचना उपलब्ध आहेत. SIR संदर्भातील मदतीसाठी 1950 हेल्पलाइन देखील उपलब्ध आहे.
मतदारांनी आजच काय करावे?
१. प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासा.
२. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात त्रुटी आहे का ते पाहा.
३. नाव यादीत नसल्यास दावे-हरकतींच्या प्रक्रियेची माहिती घ्या.
४. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
५. अर्ज किंवा हरकत दाखल केल्यानंतर त्याची स्थिती तपासा.
अंतिम मतदार यादी कधी?
निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सध्या मतदारांसाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपले नाव प्रारूप यादीत आहे की नाही, हे तपासणे आणि आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करणे.
मतदार यादीत नाव आहे की नाही, हे एकदा तपासा; कारण मतदानाच्या दिवशी अडचण येण्यापेक्षा आताच नोंद तपासणे महत्त्वाचे आहे.






