पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शन; स्वामी विवेकानंद शाळेतील १०० विद्यार्थ्यांची वाहतूक शाखेला भेट
श्रीकांत पाचकवडे
अकोला : विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्यात नागरी जबाबदारीची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद शाळेतील पाचवी ते दहावीच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी अकोला शहर वाहतूक शाखेला भेट दिली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विलास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून वाहतूक शाखेचे दैनंदिन कामकाज, वाहतूक नियंत्रणाची पद्धत आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वाहतूक सिग्नलचे पालन, वेगमर्यादा, सुरक्षित ओव्हरटेकिंग यांसह वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
विशेषतः अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे किती धोकादायक आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत, हा संदेश यावेळी देण्यात आला.
वाहतूक पोलिसांचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवले
विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांच्या कामकाजाची माहिती घेत आधुनिक तपासणी यंत्रणा व वाहतूक नियंत्रणाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन स्वतः करण्यासोबतच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्येही जनजागृती करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
“विद्यार्थी हे भावी समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामध्ये लहानपणापासून वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होईल,” असे यावेळी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेविषयी माहितीपत्रिकांचे वाटप करण्यात आले. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशा समाजोपयोगी जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
यावेळी स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक मनीष गावंडे, मनीषा उंबरकर, अविनाश मते, जयेश चोपडे, आशा डाबेराव, सोनाली मानकर, पद्मावती लंगोटे, पौर्णिमा करांडे, हर्षा सोळंके, मनोज बनसोड यांच्यासह पाचवी ते दहावीतील सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते.
उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक विलास पाटील तसेच वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे आभार मानले.






