एसबीएल एनर्जीमध्ये सकाळी भीषण स्फोट : दुर्घटनेत 15 कामगारांचा मृत्यू ; अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगार्याखाली अडकले
नागपूर: काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जीमध्ये या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी सातच्या सुमारास एक भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत किमान 15 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 20 हून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळ एसबीएल एनर्जीचा प्रकल्प असून येथे डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स आणि सिस्मिक एक्सप्लोजिव्ह्सचे उत्पादन केले जाते. याच प्रकल्पातील एका युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की परिसरात मोठा आवाज घुमला आणि कारखान्याच्या काही भागांना आग लागली. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर काही कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये बहुसंख्य महिला कामगारांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून कंपनीच्या सुरक्षितता उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कंपनीकडून सुरक्षिततेबाबत मोठे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही कामगारांना आवश्यक प्रशिक्षण न देता कामावर घेतले जात असल्याचाही आरोप होत आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्फोटक साठवण किंवा उत्पादन प्रक्रियेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.






