Home Breaking News 50 लाखांचा खंडणीची हाव : शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं ;...

50 लाखांचा खंडणीची हाव : शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं ; अटकेनंतर पश्चातापही नाही

50 लाखांचा खंडणीची हाव : शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं ; अटकेनंतर पश्चातापही नाही

नागपूर : हनुमान जयंती शोभायात्रेतून अपहरण करून अवघ्या १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. गुन्हे शाखेने या घटनेचा उलगडा केला. जयराम गोपाल यादव (१९, रा. आयबीएमरोड), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२, रा. कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयुष मोहन साहू (१९, रा. शिवशंकर मंदिरासमोर, मानकापूर) अशी मारेकऱ्यांची नावे आहे. अश्विन (नाव बदलले आहे) याचा शेजारी जय हाच या हत्येचा सूत्रधार आहे. अश्विन जयला दादा म्हणायचा, त्याच्यावर विश्वास असल्यानेच तो जयसोबत गेला.

अश्विनचे वडील दिलीप हे भाजीपाल्याचे थोक विक्रेते आहेत. तिन्ही आरोपीसुद्धा भाजी पाल्याचा व्यवसाय करतात. अश्विनच्या वडिलांकडून हे तिघेही अनेकदा भाजीपाला खरेदी करत. यातील आयुष हा पार्सल पोहोचविणाऱ्या कंपनीतही काम करतो. त्यासाठी त्याने महिंद्राची एक चार चाकी गाडीही घेतली होती. हीच गाडी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. अश्विनचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते दिलीप यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता. २ एप्रिल रोजी अश्विनच्या राहत्या घरासमोरून हनुमान जयंतीची शोभायात्रा जात होती. अश्विन या शोभायात्रेत होता. तेव्हा या परिसरात आईस्क्रिमचे वाटप सुरू होते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ‘चल आपण एक फेरफटका मारून येऊ असे सांगून जय अश्विनला घेऊन गेला. आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. त्या तिघांनी अश्विनला आयुषच्या गाडीत बसविले व तेथून निघाले. काही अंतर दूर गेल्यानंतर अश्विनने दादा आपण इतक्या दूर कसे काय आलो? असा प्रश्न केला. यावर जयने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. या बोळ्याला उंदीर मारण्याचे औषध लावले होते. यामुळे अश्विन बेशुद्ध होईल असा आरोपींचा अंदाज चुकीचा ठरला. अश्विन आरडाओरडा करू लागला. अखेर या गोंधळात आरोपींनी कापडाच्या साहाय्याने अश्विनचा गळा आवळून खून केला. पुढे आरोपींनी अश्विनची बॉडी एका पोत्यात टाकली व कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरातील रिंगरोडलगतफेकून दिली.

सीटीव्ही फुटेजच्या तपासादरम्यान अश्विन अखेरचा जयसोबतच आईस्क्रीम पार्लरजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले. गिट्टीखदान पोलिस व गुन्हे शाखेने जयची चौकशी केली. येथे जयच्या जबाबात तफावत आढळून आली. अखेर कसून चौकशी केल्यावर जयने गुन्ह्याची कबुली दिली. या चौकशी दरम्यान पोलिसांनी जयला चांगलाच पोलिसी हिसका दाखविल्याचे कळते. मात्र, त्याच्या डोळ्यात आसवाचे टिपूसही नव्हते. यावर ‘मुझे रोनाही नही आता,’ असे जयने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला सांगितल्याचे कळते. अश्विनच्या हत्येनंतर त्याचं शव आरोपींनी भरतवाडा परिसरात फेकून दिला. यानंतर तिघेही आपआपल्या घरी परतले. त्यानंतर अश्विनच्या पालकांसोबत जय स्वत: गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आला. त्यामुळे स्वतः हत्त्या केल्यानंतर साळसुदपणाचा आव आणून जय अश्विनच्या कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात तक्रार द्यायलाही आला होता, हे विशेष.

Don`t copy text!