Home विदर्भ खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : कुलगुरू डॉ. शरद...

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : कुलगुरू डॉ. शरद गडाख

Akola News
अकोला | श्रीकांत पाचकवडे
Akola News : यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत असताना शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीचे नियोजन करावे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत आणि नफ्याची शेती करण्यासाठी विविध उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
पावसाचा पॅटर्न बदलला, पण संधी कायम
डॉ. गडाख यांनी सांगितले की, मागील ५० वर्षांच्या आकडेवारीनुसार पावसाचे एकूण प्रमाण कमी झालेले नाही. मात्र पावसाची तीव्रता आणि वितरणाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन जोखीम व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.
कपाशी आणि सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांसोबत भरड धान्ये, तेलबिया तसेच आंतरपिकांचा समावेश केल्यास उत्पादनातील जोखीम कमी होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
एकात्मिक शेती हीच काळाची गरज
शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगताना डॉ. गडाख म्हणाले की, पिकांची फेरपालट, पशुपालन, सेंद्रिय घटकांचा वापर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग यामुळे शेती अधिक सक्षम होऊ शकते. भविष्यातील कृषी विकासासाठी एकात्मिक शेती हीच प्रभावी दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाचे सूक्ष्म नियोजन पूर्ण
यावेळी कृषि सहसंचालक उमेश घाटगे यांनी खरीप हंगामासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. विभागाने शास्त्रशुद्ध सूक्ष्म नियोजन केले असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाने विकसित केलेली सुधारित बियाणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन
मेळाव्यात विविध विषयांवर कृषी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
हवामान अंदाज – डॉ. अरविंद तुपे
कपाशी लागवड तंत्रज्ञान – डॉ. संजय काकडे
सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान – डॉ. सतीश निचळ
कीड व्यवस्थापन – डॉ. प्रवीण राठोड
रोग व्यवस्थापन – डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर
तण व्यवस्थापन – डॉ. विकास गौड
यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी थेट उत्तरे देत विविध शंकांचे निरसन केले.
विद्यापीठाकडे मुबलक बियाणे उपलब्ध
यंदाच्या खरीप हंगामासाठी विद्यापीठाच्या नियोजनातून विविध पिकांच्या बियाण्यांची मुबलक उपलब्धता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी थेट विद्यापीठातून दर्जेदार बियाणे खरेदी करून हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले.
चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शेतकरी मेळाव्यात अकोला, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. महिला बचत गट आणि स्त्री शक्ती समूहांनी सामूहिक बियाणे खरेदी करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
ठळक मुद्दे
• एल निनोच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे आवाहन
• कपाशी- सोयाबीनसोबत आंतरपिकांवर भर
• एकात्मिक शेती पद्धती स्वीकारण्याचा सल्ला
• कृषी विभागाचे खरीपसाठी सूक्ष्म नियोजन पूर्ण
• विद्यापीठ संशोधित बियाण्यांची मुबलक उपलब्धता
• तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन व शंका निरसन
Don`t copy text!