Home महाराष्ट्र राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी बंद; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची...

राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी बंद; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मोठी घोषणा

aakash fundakr
माथाडी कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
अकोला | श्रीकांत पाचकवडे
राज्यातील माथाडी कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकार लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे. माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे नियम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी जारी केलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माथाडी कामगारांच्या हितासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बोलताना मंत्री फुंडकर म्हणाले की, राज्यातील माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये या विषयावर कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांचे आरोग्य जपणे आणि त्यांना सुरक्षित कार्यपरिस्थिती उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून राज्यात यासंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
त्यांनी पुढे सांगितले की, राज्यात माथाडी कामगारांकडून केवळ ५० किलोपर्यंत वजनाचीच हाताळणी करण्याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येणार आहे. तसेच इतर राज्यांमध्येही अशा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाणार आहे.
कृषी बाजार समित्या आणि व्यापारी संघटनांनाही सूचना
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १५ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ (लासलगाव) यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार समित्या, व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, बियाणे महामंडळ, वखार महामंडळ आणि इतर संबंधित आस्थापनांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही उद्योग, व्यवसाय किंवा व्यापारात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची चढ-उतार किंवा हाताळणी कामगारांकडून करून घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कामगार विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आरोग्य संरक्षणाला प्राधान्य
माथाडी कामगारांना दीर्घकाळ जड वजन उचलावे लागल्यामुळे पाठदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे विकार आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
बैठकीला विविध मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला माजी आमदार तथा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड, विविध विभागांचे अधिकारी, माथाडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“कामगारांचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे”
“माथाडी कामगारांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही. ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी व्यापारी संघटना आणि कामगार संघटनांचे सहकार्यही महत्त्वाचे ठरणार आहे,” असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले.
Don`t copy text!