श्रीकांत पाचकवडे /Akola News
अकोला : वैवाहिक छळाला कंटाळून विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय देत आरोपी पतीला ७ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. महिला अत्याचार व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये हा निकाल न्यायव्यवस्थेचा ठोस संदेश मानला जात आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सातवळेकर यांनी दि. १९ जून २०२६ रोजी सत्र खटला क्रमांक ६४/२०२३ मध्ये हा निकाल दिला. पोलीस स्टेशन उरळ येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २१९/२०२२ मधील सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी आशिष वसंतराव नागे (रा. पैलपाडा, ता. जि. अकोला) यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अन्वये दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तर कलम ४९८(अ) अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
विवाहितेच्या मृत्यूनंतर उघड झाले छळाचे वास्तव
फिर्यादी नंदा रामदास साबळे (रा. मांजरी, ता. बाळापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरळ पोलीस ठाण्यात आरोपींसह कुटुंबीयांविरुद्ध वैवाहिक छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहितेला सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होता.
या गंभीर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सागर गोमासे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांच्या सुसंगत साक्षी आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध होण्यास मदत झाली.
सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
सुनावणीदरम्यान शासनाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. शाम खोटरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीच्या कृत्यांमुळे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
पाच आरोपींची निर्दोष मुक्तता
दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपी शोभा नागे, नितीन नागे, वसंता नागे, जयश्री खराटे आणि शारदा जामणीक यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
पोलिसांच्या पाठपुराव्याला यश
या खटल्याच्या यशस्वी पैरवीसाठी सीएमएस सेलचे अन्चर खान, उकंडा जाधव तसेच उरळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी मतने यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उरळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून खटल्याचा प्रभावी पाठपुरावा केला.
महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक छळाच्या घटनांमध्ये न्यायालयाने दिलेला हा निर्णय पीडितांना न्याय मिळवून देणारा ठरला असून अशा गुन्हेगारांना कायदा माफ करणार नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आला आहे.






