बुलढाणा | श्रीधर ढगे
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेल्या सलग पाच दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला आहे. प्रकृतीत सतत बिघाड होत असल्याने त्यांना मध्यरात्री पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
अन्नत्याग आंदोलनाचा प्रकृतीवर गंभीर परिणाम
रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, सोयाबीन व कापूस उत्पादकांना आर्थिक मदत, शेतमालाला हमीभाव आणि इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलन जसजसे पुढे सरकत गेले, तसतशी त्यांच्या प्रकृतीची स्थिती अधिक गंभीर होत गेली. रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घसरल्याने डॉक्टरांनी वारंवार इशारे दिले होते.
राज्यभरातून आंदोलनाला मोठा प्रतिसाद
तुपकर यांच्या आंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा दर्शविला. अनेक ठिकाणी रास्तारोको, निषेध मोर्चे आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना राज्य सरकारवरही दबाव वाढला होता.
गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित
राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. सरकारच्या वतीने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चार दिवसांचा अवधी मागण्यात आला. शेतकरी बांधवांच्या भावना आणि सरकारच्या विनंतीचा मान राखत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
डायबेटिक केटोॲसिडोसिसचा धोका वाढला
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी अद्याप सामान्य झालेली नाही. शरीरातील ‘किटोन’चे प्रमाण वाढल्याने ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका निर्माण झाला आहे. तसेच किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याची चिन्हे दिसून येत असून शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवरही ताण पडत आहे.
इन्फेक्शनमुळे डॉक्टरांची चिंता वाढली
पाच दिवसांच्या अन्नत्यागामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली असून शरीरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
शेतकरी आणि समर्थकांचे सरकारकडे लक्ष
सध्या छत्रपती संभाजीनगर येथे तुपकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, सरकारने मागितलेल्या चार दिवसांच्या मुदतीत शेतकरी प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जातो की नाही, याकडे राज्यभरातील शेतकरी आणि तुपकर समर्थकांचे लक्ष लागले आहे. आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकरी प्रश्नांवरील संघर्ष अद्याप संपलेला नसल्याची भावना समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.





