Home Breaking News “तिचं आजचं हसू आणि तिची उद्याची स्वप्नं… दोन्ही तितकीच जपावीशी वाटतात!”; लेकीबद्दल...

“तिचं आजचं हसू आणि तिची उद्याची स्वप्नं… दोन्ही तितकीच जपावीशी वाटतात!”; लेकीबद्दल बोलताना मंत्री आकाश फुंडकर भावुक

 

आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मुलींच्या स्वप्नांना दिले बळ; म्हणाले, “तुझ्या पाठीशी आम्ही आहोत”

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : मुलगी म्हणजे केवळ घरातील आनंद नव्हे, तर ती कुटुंबाच्या भविष्याची आशा आणि स्वप्नांना नवी दिशा देणारी प्रेरणा असते. आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आपल्या लेकीबद्दलच्या भावना व्यक्त करताना प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना, आत्मविश्वासाला आणि स्वावलंबनाला बळ देणारा भावनिक संदेश दिला.

 

“माझ्या लेकीकडे पाहताना एक गोष्ट नेहमी जाणवते… तिचं आजचं हसू आणि तिची उद्याची स्वप्नं, दोन्ही तितकीच जपावीशी वाटतात,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या लेकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

 

मुलीने आयुष्यात स्वतःच्या मनाप्रमाणे शिकावे, मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्यात कितीही आव्हाने आली, तरी “तुझ्या पाठीशी आम्ही आहोत” हा विश्वास प्रत्येक मुलीला तिच्या कुटुंबाकडून मिळणे गरजेचे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

 

मुलींच्या स्वप्नांना मिळावा कुटुंबाचा आधार

 

प्रत्येक मुलीला आपल्या आवडीचे शिक्षण घेण्याची, स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि आयुष्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी मिळावी, हा संदेशही फुंडकर यांच्या भावनांमधून व्यक्त झाला. मुलींच्या स्वप्नांना मर्यादा न घालता त्यांना प्रोत्साहन देणे ही पालकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांच्या संदेशातून स्पष्ट झाले.

 

“प्रत्येक मुलीला आपल्या मनासारखे आयुष्य घडवण्याची संधी मिळावी”

 

आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने आपल्या लेकीसह प्रत्येक मुलीसाठी शुभेच्छा देताना फुंडकर यांनी प्रत्येक मुलीला आपल्या मनासारखे आयुष्य घडवण्याची संधी मिळावी आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.

 

मुलीच्या आजच्या हास्यात तिच्या उद्याच्या स्वप्नांचे प्रतिबिंब पाहणारा आणि त्या स्वप्नांना पालकांचा आधार मिळावा, असा संदेश देणारी मंत्री आकाश फुंडकर यांची ही भावना कन्या दिनाच्या निमित्ताने चर्चेचा विषय ठरली.

Don`t copy text!