Home Breaking News राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश मिरगे यांची निवड!

राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश मिरगे यांची निवड!

 

अमरावती येथे १५ नोव्हेंबरला सहावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

 

शेगाव, : सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. राजेश मिरगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अंबानगरी अमरावती येथे दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी या भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक श्री. इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा प्राचार्य प्रमोद मुनघाटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

 

संत साहित्याचा सखोल अभ्यास, साहित्याविषयीची आस्था आणि साहित्य क्षेत्रातील योगदान यांमुळे डॉ. राजेश मिरगे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे साहित्यप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे संमेलनाच्या आयोजनाला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा जीएसटी अधिकारी श्री. प्रवीणजी बोपुलकर यांनी डॉ. राजेश मिरगे यांच्यासह संमेलनातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींना विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार असून, मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला नवे व्यासपीठ मिळणार आहे.

Don`t copy text!