Home Breaking News धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणी असेल, तर उभ्या पिकांना दोन वेळा पाणी...

धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणी असेल, तर उभ्या पिकांना दोन वेळा पाणी द्या : रविकांत तुपकर 

 

रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कर्जमाफी, पीकविमा आणि वीज कनेक्शनच्या प्रश्नांवरही आंदोलन

 

बुलढाणा (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांची उभी पिके वाचवण्यासाठी ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांच्या परिसरातील शेतकऱ्यांना ठिबक किंवा स्प्रिंकलरद्वारे किमान दोन वेळा पाणी देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्याकडे केली. जनावरांसाठी चारा उत्पादनाची संधी देण्यासह सरसकट वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, कर्जमाफी, पीकविमा आणि नवीन पीककर्जाचे प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी त्यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

 

तुपकर यांनी २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने निर्देश देण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले.

 

रब्बी हंगामाची आशा धूसर झाली असताना तूर, हळद आणि अन्य उभी पिके वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा मर्यादित वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जनावरांसाठी चारा पिकवण्याची संधी देऊन पशुपालक शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा, असे त्यांनी म्हटले.

 

कर्जमाफीतील गोंधळ दूर करून पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, सीबिलच्या कारणावरून कर्ज नाकारू नये, नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांचे अनुदान द्यावे आणि नुकसानग्रस्तांना पीकविम्याची भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. भूमिहीन शेतमजुरांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तसेच बटाईने शेती करणाऱ्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

 

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन सरसकट तोडण्याची कारवाई थांबवावी, जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करावेत आणि मायक्रो फायनान्स कंपन्या व खासगी पतसंस्थांच्या वसुलीच्या ताणातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही तुपकर यांनी केली.

 

या आंदोलनात देविदास कनखर, विनायक सरनाईक, एकनाथ पाटील, अमोल मोरे यांच्यासह क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!