Home Breaking News पावसासाठी बळीराजाचा टाहो! दहीहंड्यात पूर्णा नदीच्या पाण्याने भरला संत रूपनाथ महाराजांचा गाभारा

पावसासाठी बळीराजाचा टाहो! दहीहंड्यात पूर्णा नदीच्या पाण्याने भरला संत रूपनाथ महाराजांचा गाभारा

 

दहीहांडा ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम; शेतकऱ्यांच्या संकटातून सुटका व्हावी, यासाठी श्री संत रूपनाथ महाराजांना पावसाची आर्त हाक

 

कुशल भगत 

 

अकोट:दहीहांडा गावचे आराध्य दैवत म्हणून श्रद्धास्थान असलेल्या श्री संत रूपनाथ महाराजांवर ग्रामस्थांची मोठी श्रद्धा आहे. यंदा पावसाने दांडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत असताना, ग्रामस्थांनी आपल्या श्रद्धेच्या माध्यमातून पावसासाठी देवाला साकडे घालण्याचा अनोखा उपक्रम राबविला.सध्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पिकांची वाढ खुंटण्याची चिंता, पाण्याची टंचाई आणि पुढील दिवसांबाबतची अनिश्चितता यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर दहीहांडा येथील ग्रामस्थांनी पूर्णा नदीचे पवित्र जल आणून श्री संत रूपनाथ महाराज मंदिरातील शिवलिंग असलेला गाभारा पाण्याने भरला. शिवलिंगाला जल अर्पण करून ग्रामस्थांनी मनोभावे प्रार्थना केली.

“देवा, पावसाने दडी मारली आहे. आमचा शेतकरी संकटात आहे. आता तूच त्याला वाचव आणि लवकर पाऊस पाड,” अशा भावनिक शब्दांत ग्रामस्थांनी श्री संत रूपनाथ महाराजांना साकडे घातले.

या वेळी ‘सर्व शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, शेतीला भरपूर पाणी मिळू दे आणि परिसरात समाधानकारक पाऊस पडू दे’, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

गावातील धार्मिक श्रद्धा आणि शेतकऱ्यांच्या व्यथा यांचा संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. पूर्णा नदीचे पाणी आणून मंदिरातील गाभारा भरून देवाला पावसाची विनंती करण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.शेतकरी हा गावाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या शेतीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लवकर बदलावी, वरुणराजाने कृपादृष्टी करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतात पुन्हा हिरवाई फुलावी, अशीच अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

 

 

“देवा, शेतकरी संकटात आहे… आता तूच वाचव!”

श्री संत रूपनाथ महाराजांच्या चरणी ग्रामस्थांची सामूहिक प्रार्थना; पावसासाठी केलेला अनोखा उपक्रम परीसरात चर्चेत

Don`t copy text!