Home Breaking News अकोल्यावर पाणीटंचाईचे संकट; काटकसरीने पाणी वापरा!- सीईओ अनय नावंदर 

अकोल्यावर पाणीटंचाईचे संकट; काटकसरीने पाणी वापरा!- सीईओ अनय नावंदर 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : कमी पर्जन्यमानामुळे अकोला जिल्ह्यातील जलसाठ्यांवर गंभीर परिणाम झाला असून, आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी केले.

 

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील विविध धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी जलस्रोतांचा शोध, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

 

महान, दगडपारवा, उनई बंधाऱ्याची पाहणी

 

याच पार्श्वभूमीवर सीईओ अनय नावंदर यांनी महान, दगडपारवा तसेच उनई बंधारा आणि सुकळी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलसाठ्याची सद्यस्थिती, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि आगामी काळातील संभाव्य अडचणींचा आढावा घेतला.

 

उनई बंधाऱ्यातील गाळ उपसण्यासह आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

 

पाणीपुरवठ्यात कपातीचे संकेत

 

पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ‘६४ खेडी पाणीपुरवठा योजने’तील गावांच्या पाणीपुरवठ्यात आवश्यकतेनुसार कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे संकेतही नावंदर यांनी दिले. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याची गरज आहे.

 

या पाहणीदरम्यान ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, उपअभियंता कांचन उमाळे, अंकित जाधव यांच्यासह कनिष्ठ अभियंते आणि स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.

Don`t copy text!