Home Breaking News मित्रच जीवावर उठला ; 15 दिवसांपूर्वीच नागपुरात वेटरची नोकरी मिळाली अन् घात...

मित्रच जीवावर उठला ; 15 दिवसांपूर्वीच नागपुरात वेटरची नोकरी मिळाली अन् घात झाला

मित्रच जीवावर उठला ; 15 दिवसांपूर्वीच नागपुरात वेटरची नोकरी मिळाली अन् घात झाला

नागपूर : शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विहिरगाव परिसरात एका घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा तपास केला, तेव्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. घरात एका ३६ वर्षीय तरुणाचा विद्रूप आणि रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. मृतकाचे नाव अनिल मधुकर पवार असून, तो यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होता. नागपूरमध्ये तो त्रिमूर्ती बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या सुमारे ५ ते ६ दिवसांपूर्वी झाली असावी. अनिलच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. घराच्या खोलीतून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास केला असता, खोलीत अनिलचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. तपासादरम्यान, खोलीतील गॅस स्टोव्ह आणि हेल्मेटवरही रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे हत्येसाठी याच वस्तूंचा वापर करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अनिल १५ मे रोजी नोकरीच्या शोधात नागपूरला आला होता. येथे तो आपल्या मित्र, राज पवार या तरुणासोबत राहत होता. राज पवार विहिरगाव येथील ‘द हॉटेल शिप’मध्ये वेटर म्हणून काम करत होता. मात्र, घटनेनंतर राज पवार अचानक बेपत्ता झाला असून त्याच्यावरील संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, राज पवारचा शोध सुरू आहे.

Don`t copy text!