Home Breaking News अनकवाडीत तलावाकाठी ९ फुटांचा अजगर! ग्रामस्थांमध्ये खळबळ; सर्पमित्र सूरज इंगळे यांनी केले...

अनकवाडीत तलावाकाठी ९ फुटांचा अजगर! ग्रामस्थांमध्ये खळबळ; सर्पमित्र सूरज इंगळे यांनी केले सुरक्षित रेस्क्यू

 

तलाव परिसरात महाकाय अजगर दिसताच नागरिकांची धावपळ; वन्यजीवाला इजा न पोहोचवता रेस्क्यू

कुशल भगत

 

अकोट : अकोट तालुक्यातील अनकवाडी येथील मोठ्या तलावाच्या परिसरात तब्बल ९ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. अजगराचा मोठा आकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अकोला येथील सर्पमित्र सूरज इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

अनकवाडी येथील मोठ्या तलावाजवळ ग्रामस्थांना हा अजगर दिसून आला. अजगराची लांबी सुमारे नऊ फूट असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी अजगराला इजा न पोहोचवता अकोला येथील सर्पमित्र सूरज इंगळे यांच्याशी संपर्क साधला.

 

घटनेची माहिती मिळताच सूरज इंगळे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक उपकरणांच्या मदतीने त्यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आणि ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला.

 

वन्यजीवाला इजा न करता सुरक्षित अधिवासात सोडण्याची तयारी

 

अजगराला पकडल्यानंतर त्याला कोणतीही दुखापत होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.

 

या घटनेत ग्रामस्थांनी सापाला मारण्याचा किंवा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्राची मदत घेतल्याने वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकतेचा सकारात्मक संदेश मिळाला. सर्पमित्र सूरज इंगळे यांनी दाखवलेली तत्परता आणि वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता याबद्दल अनकवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानत कौतुक केले.

 

OTT News

Don`t copy text!