कुटासातील विलास थोटे यांचा आरोप; महामंडळाचे व्यावसायिक कर्ज फेडल्याशिवाय पीक कर्ज देण्यास नकार, शाखा व्यवस्थापकांनी मांडली तांत्रिक अडचण
विशेष प्रतिनिधी : कुशल भगत
चोहोट्टा बाजार : आधीच दुष्काळी परिस्थिती आणि करपलेल्या कपाशीच्या पिकामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा प्रकार अकोट तालुक्यातील कुटासा येथे समोर आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुटासा शाखेकडून पीक कर्ज मिळत नसल्याचा आरोप शेतकरी विलास महादेव थोटे यांनी केला असून, याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी अकोला आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अकोट यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे दाद मागितली आहे.
व्यावसायिक कर्जाचे कारण देत पीक कर्जास नकार?
विलास महादेव थोटे हे कुटासा (भाग १) येथील गट क्रमांक ६६८ मधील ०.९३ आर जमिनीचे मालक असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे पीक कर्ज होते. हे कर्ज माफ झाल्यानंतर नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी ते बँकेत गेले असता, त्यांच्या नावावर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यावसायिक कर्ज असल्याचे कारण देत बँकेने पीक कर्ज देण्यास नकार दिल्याचा त्यांचा आरोप आहे.
थोटे यांच्या म्हणण्यानुसार, महामंडळाकडून घेतलेल्या व्यावसायिक कर्जाची मुदत २०२५ ते २०३० अशी असून, ते या कर्जाची नियमानुसार परतफेड करण्यास तयार आहेत. मात्र, पीक कर्ज मिळवण्यासाठी आधी संपूर्ण व्यावसायिक कर्जाची परतफेड करून ते कर्ज खाते बंद करण्यास सांगितले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
करपलेली कपाशी, आर्थिक संकट आणि कर्जाचा पेच!
आधीच दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हतबल झाला आहे. त्यात शेतातील कपाशीचे पीक करपल्याने उत्पन्नावर परिणाम झाला असून, अशा परिस्थितीत व्यावसायिक कर्जाची संपूर्ण रक्कम एकाच वेळी फेडणे शक्य नसल्याचे थोटे यांनी सांगितले. शेतीसाठी आवश्यक असलेले पीक कर्जच मिळत नसल्याने आर्थिक अडचणी अधिक वाढत असल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि सहाय्यक निबंधकांनी लक्ष घालून संबंधित नियमांची तपासणी करावी, तसेच पात्रतेनुसार आपल्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी विलास महादेव थोटे यांनी केली आहे.
बँकेची भूमिका काय?
दरम्यान, या प्रकरणावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुटासा शाखेचे व्यवस्थापक बजरंग साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारे अडवणूक केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आधीच एखाद्या बँकेचा किंवा संस्थेचा बोजा असल्यास आमची प्रणाली पीक कर्जाची प्रक्रिया स्वीकारत नाही,” असे शाखा व्यवस्थापक बजरंग साबळे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे एका बाजूला व्यावसायिक कर्जाची परतफेड सुरू असतानाही पीक कर्ज मिळत नसल्याने अडचणीत सापडलेला शेतकरी, तर दुसऱ्या बाजूला सातबाऱ्यावरील बोजा आणि बँकेच्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा मुद्दा, असा हा पेच निर्माण झाला आहे.
आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
शेतकऱ्याच्या व्यावसायिक कर्जाचा बोजा, पीक कर्जासाठी लागू असलेले नियम आणि बँकेच्या प्रणालीतील अडचणी यांची संबंधित प्रशासनाकडून तपासणी झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विलास थोटे यांना पीक कर्ज मिळणार का आणि त्यांच्या शेतीच्या हंगामाला आर्थिक आधार मिळणार का, याकडे कुटासा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






