Home Breaking News राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्ग रोखणार, आमदार नितीन...

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्ग रोखणार, आमदार नितीन देशमुख यांचा पत्रकार परिषदेतून इशारा

 

 

श्रीकांत पाचकवडे 

अकोला: दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज असताना महायुती सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचे महापाप केले असून येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदत न दिल्यास ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.

 

 

 

सलग २१ दिवस पाऊस न पडल्यास संबंधित गाव, तालुक्यात कोरडा दुष्काळ घोषित करता येतो. परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत द्यायचीच नाही, असा चंग बांधलेल्या महायुती सरकारने ५० दिवस उलटून गेल्यानंतरही कोरडा दुष्काळ जाहीर केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही २० सप्टेंबर पासून पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला प्रारंभ केल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. पिक पंचनामे व सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५ ऑक्टोबर नंतर मदत जाहीर करू, अशी भूमिका शासनाने घेतली; परंतु वर्तमान स्थिती पाहता शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज असताना महायुती सरकारने दिवाळी गोड करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली. हा प्रकार म्हणजे संकटग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून त्यांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचे पाप सरकार करीत असल्याचा आरोप उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी केला. पत्रकार परिषदेत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे (यवतमाळ), जिल्हाप्रमुख बालाजी वानखडे (वाशिम), जिल्हाप्रमुख पराग गुडधे, प्रफुल्ल भोजने, (अमरावती), जिल्हाप्रमुख गजानन वाघ (बुलढाणा), जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, उपजिल्हाप्रमुख संजय शेळके, सुरेंद्र विसपुते, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहरप्रमुख राहुल कराळे (अकोला पूर्व), युवासेना जिल्हाप्रमुख नगरसेवक अभय खुमकर, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, संजय भांबेरे आदी उपस्थित होते.

 

मंत्र्यांच्या हेअर डायचा खर्च यापेक्षा अधिक

 

अर्थकारणाच्या हिशोबात पक्के असणाऱ्या सरकारने पाच हजार रुपयात शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची ते स्पष्ट करावे. सरकारमधील काही मंत्र्यांच्या दाढी मिशीवर होणाऱ्या हेअर डायचा खर्च पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचा टोला आमदार देशमुख यांनी लगावला.

 

शेलुबाजार येथे आंदोलनाचे रणशिंग

 

समृद्धी महामार्ग हा कोणाची खाजगी मालमत्ता नाही. असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करून त्यावर हा महामार्ग उभारण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील शेतकरी वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार या ठिकाणी एकत्र येतील. तेथून समृद्धी महामार्ग रोखण्यात येईल, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

 

साड्या वाटप केल्याने शिक्षकांची प्रतिमा धुळीस

 

गतवेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काही उमेदवारांनी साड्यांचे वाटप केले होते. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिमा धुळीस मिळाली. साड्या वाटप केल्याने शिक्षकांच्या समस्या मार्गी लागल्या का? असा प्रश्न उपस्थित करीत आमदार देशमुख यांनी महायुतीच्या उमेदवारावर निशाणा साधला.

Don`t copy text!