Home Breaking News मनपा शिक्षकांना दिलासा; सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी वितरणास अखेर सुरुवात

मनपा शिक्षकांना दिलासा; सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी वितरणास अखेर सुरुवात

Akola News

आमदार साजिद पठाण यांच्या पाठपुराव्याला यश, शिक्षक संघटनेकडून जाहीर कृतज्ञता

श्रीकांत पाचकवडे/  Akola News
अकोला : अकोला महानगरपालिकेतील शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ५० टक्के थकबाकीच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या मागणीला मंजुरी मिळाल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांचे शिक्षक संघटनेकडून विशेष आभार मानण्यात आले.

महानगरपालिकेतील शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, मुख्याध्यापक पदोन्नती, पदवीधर शिक्षक पदोन्नती, निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी यांसारखे अनेक सेवा विषयक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर २०२५ मध्ये आमदार साजिद पठाण आणि आमदार धीरज लिंगाडे यांनी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासोबत बैठक घेऊन शिक्षकांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली होती.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींनी सातत्याने प्रयत्न केले. त्यानंतर मनपा प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी वितरणाची प्रक्रिया सुरू केली असून, इतर प्रलंबित प्रश्नांच्या निपटाऱ्यालाही गती मिळाल्याचे समोर आले आहे.

या निर्णयानंतर अकोला मनपा शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार साजिद खान पठाण यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत प्रभावी पाठपुरावा केल्याबद्दल संघटनेने त्यांचे तसेच मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, राज्य सरचिटणीस राजीव भिरड, राज्य संघटक अन्वर हुसेन शेख, रहेमान अवधूत, हाफिज खान, नईम फराज, युवराज पठाडे, मनोज बोचरे, गजेंद्र ढवळे, मजहर सर, अनीस खान, नझीम सर, संदीप राठोड, मयूर पवार, सुशीला सोनवणे, नयना गोटे, सज्जाद अहमद, वसीमूर रहेमान, रिजवान सर यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी वितरणाचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उर्वरित सेवा विषयक प्रश्नांबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Don`t copy text!