१ लाख ५३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई
कुशल भगत
अकोट : दहीहांडा येथे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत कथित बेकायदेशीर गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण १३५ किलो गोवंश मांस आणि दोन दुचाकी असा १ लाख ५३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन वेगवेगळ्या कारवायांत जप्ती
पहिली कारवाई : पोलिसांनी अब्दुल नाशिर अब्दुल रशीद (वय ५३, रा. दहीहांडा, जि. अकोला) याच्याकडून ७० किलो गोवंश मांस, अंदाजे किंमत १७ हजार ५०० रुपये, तसेच होंडा शाइन मोटरसायकल (क्रमांक MH 30 BE 3542), अंदाजे किंमत ६० हजार रुपये, असा एकूण ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई : अस्लम अहमद शेख मुसा (वय ३८, रा. दहीहांडा, जि. अकोला) याच्याकडून ६५ किलो गोवंश मांस, अंदाजे किंमत १६ हजार २५० रुपये, तसेच हिरो होंडा सुपर स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 30 V 3429), अंदाजे किंमत ६० हजार रुपये, असा एकूण ७६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५(ब), ९ आणि ९(अ) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांचा पुढील तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत.






