गाडीतच जेवण, प्रवासातच प्रचार; शिक्षकांच्या हक्कांसाठी चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची ध्येयनिष्ठ धडपड!
श्रीकांत पाचकवडे
अकोला : संघर्ष हा केवळ शब्द नसतो, तर तो एखाद्या ध्येयासाठी स्वतःला झोकून देण्याचा निर्धार असतो. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या १८ वर्षांपासून अविरत लढा देणारे चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर हे त्याचे उदाहरण ठरत आहेत. वर्षानुवर्षे संघर्षाची वाट चालताना त्यांच्या ध्येयाची ओढ आजही कायम आहे.
सध्या अमरावती विभागातील शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे. प्रत्येक शिक्षकाला भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि आपल्या कार्याची माहिती पोहोचवणे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या धावपळीत वेळ वाचवण्यासाठी चक्क गाडीतच जेवण करण्याची वेळ त्यांच्यावर येते. कारण त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असून, शिक्षकांशी संवाद साधण्याची प्रत्येक संधी मोलाची आहे.
स्वतःच्या सुखसोयींपेक्षा ध्येय मोठे!
आराम, विश्रांती आणि वैयक्तिक सुखसोयी यांचा विचार करण्यापेक्षा शिक्षकांचे प्रश्न आणि त्यांचे न्याय्य हक्क यांनाच प्राधान्य देणारा हा प्रवास आहे. १८ वर्षांचा संघर्ष म्हणजे केवळ कालावधी नव्हे, तर सातत्य, जिद्द, बांधिलकी आणि शिक्षकांच्या प्रश्नांप्रती असलेल्या तळमळीची साक्ष आहे.
संघर्षाच्या वाटेवर अडचणी येतात, थकवा जाणवतो; मात्र ध्येयावर निष्ठा असेल, तर पावले थांबत नाहीत. शेखर भोयर यांच्या या प्रवासातून त्यांची शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची तळमळ अधोरेखित होते.
१८ वर्षांचा संघर्ष… शिक्षकांच्या न्यायासाठी!
अमरावती विभागातील शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या या संघर्षयात्रीच्या कार्याकडे आता शिक्षक बांधव कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, याकडे लक्ष लागले आहे. त्यांच्या दीर्घ संघर्षाची आणि ध्येयनिष्ठेची शिक्षक निश्चितच दखल घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कारण काही माणसे पदासाठी धडपडतात, तर काही माणसे ध्येयासाठी झटतात. शिक्षकांच्या न्यायासाठी १८ वर्षांपासून संघर्ष करणारे चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर हे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारे एक संघर्षयोद्धा म्हणून आपली वाटचाल सुरू ठेवत आहेत.






