खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश, सातपुड्यातील आदिवासी भागाला रेल्वे जोडणीची आशा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : सातपुड्यातील आदिवासी भागाला रेल्वेच्या नकाशावर जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, नांदेड ते तुकाईथड विशेष रेल्वे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक क्रमांक ४५० नुसार या विशेष गाडीची घोषणा केली आहे.
रेल्वे क्रमांक ०७६८९/०७६९० असलेली ही एकदिवसीय विशेष गाडी खंडवा, अकोला आणि मलकापूर मार्गे धावणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सातपुडा परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
आदिवासी भागाच्या दळणवळणाला मिळणार चालना
सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी रेल्वेसेवा सुरू होणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या भागातील प्रवाशांना महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि देशातील इतर भागांशी संपर्क वाढविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. ही विशेष गाडी नियमित सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचा दावा खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आला आहे.
अकोट–तुकाईथड रेल्वेमार्गाच्या कामाला गती
अकोट ते तुकाईथड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे कामही प्रगतिपथावर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भूमिसंपादनासह अकोट–हिवरखेड दरम्यानची कामे सुरू आहेत. २०२७ च्या अखेरपर्यंत संपूर्ण मार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या रेल्वेमार्गामुळे सातपुड्यातील आदिवासी भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासोबतच प्रवास, व्यापार आणि प्रादेशिक संपर्काला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






