श्रीकांत पाचकवडे
अकोला : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. खरीप हंगामासाठी कृषी विभाग, खत कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये समन्वय साधून नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत तसेच खरेदीची पावती जतन करून ठेवावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. कृषी विभागाकडून खत व बियाण्यांच्या उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून कृत्रिम टंचाई निर्माण करणारे, अवैध साठेबाजी करणारे किंवा जादा दराने विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावर्षी खरीप हंगाम सुरळीत पार पडावा आणि शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियोजनबद्ध पद्धतीने खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. खरीप पिकांची पेरणी साधारणपणे जून-जुलैमध्ये सुरू होते.





