श्रीकांत पाचकवडे
अकोला : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा व सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवासी सुविधांबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
बसस्थानकातील स्वच्छता व्यवस्था, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी करून संबंधित विभागांच्या कामकाजाची समीक्षा करण्यात आली.
यावेळी मंत्र्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. काही ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत त्यांनी एसटी सेवा ही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असल्याचे नमूद केले.
तसेच बसेसच्या वेळापत्रकानुसार धावण्याची स्थिती, चालक-वाहकांची उपस्थिती, वाहनांची तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी करून तातडीने सुधारणा कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
“राज्यातील प्रत्येक एसटी बसस्थानक हे प्रवाशांच्या विश्वासाचे केंद्र बनले पाहिजे. स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता या बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
या पाहणीवेळी विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





