Home Breaking News ससेगावात आगीत चना पिकाची गंजी भस्मसात : शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान ;...

ससेगावात आगीत चना पिकाची गंजी भस्मसात : शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान ; पंचनाम्याची मागणी

ससेगावात आगीत चना पिकाची गंजी भस्मसात : शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान ; पंचनाम्याची मागणी

कुही : तालुक्यातील मौजा ससेगाव येथे शेतकऱ्याच्या मेहनतीवर पुन्हा एकदा संकट कोसळल्याची घटना घडली. येथील शेतकरी संजय हिवसे यांच्या शेतात कापून गंजी करून ठेवलेल्या चना पिकाला अज्ञात कारणाने अचानक आग लागून संपूर्ण गंजी जळून खाक झाली. या घटनेत अंदाजे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास शेतकरी संजय हिवसे हे शेतात गेले असता चना पिकाच्या गंजीतून धूर व ज्वाळा निघताना दिसून आल्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर अनेक ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. काही वेळातच शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाचे प्रतीक असलेली चना पिकाची संपूर्ण गंजी जळून खाक झाली. डोळ्यांसमोर मेहनतीचे पीक राख होताना पाहून शेतकरी हिवसे हतबल झाले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दुर्घटना की घातपात ?

ससेगाव येथे शेतकरी संजय हिवसे यांच्या शेतातील चना पिकाच्या गंजीला लागलेल्या आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग अपघाती लागली की कुणी मुद्दाम घातपात करून पेटवली, याबाबत संशय व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, सदर गंजीच्या नजीकच काही अंतरावरून विजेच्या तार गेल्या आहेत, त्यामुळे विद्युत तारेतून ठिणगी पडून आग लागली असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून आगीचे नेमके कारण शोधावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Don`t copy text!