शिवजयंती निमित्त संस्कारांची शिदोरी : ‘मुलांना संस्कारक्षम घडवणे हीच शिवरायांना खरी मानवंदना‘
कुही : फाल्गुन वद्य ३ या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, मांढळ येथील शिवजयंती उत्सव समिती व समस्त मांढळ ग्रामवासी यांच्या वतीने बुद्धे ले-आउटच्या प्रांगणात एका विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व लोकप्रिय युवा कीर्तनकार, झी मराठी फेम भागवताचार्य ह.भ.प. कांचनताई शेळके यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून ‘मुलांना चांगले संस्कार द्या आणि त्यांना संस्कारशील बनवा’ या विषयावर मार्गदर्शनपर कीर्तन सेवा सादर केली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक मांढळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन, जगतगुरु संत तुकाराम महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलन सरपंच सोनू निर्गुळकार, माजी जि.प.सदस्य मनीषा फेंडर, ग्रा.प. सदस्य आशिष आवळे, आयोजक प्रदीप कुलरकर, पत्रकार प्रदीप घुमडवार, हभप.विजय सेलोकर, हभप. सुखदेव उरकुडे, भागेश्वर फेंडर, विनोद ठवकर व असंख्य शिवप्रेमीच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर हभप विजय सेलोकर महाराज यांच्या उपस्थितीत अनेक वारकरी पंथातील महाराजांनी ‘हरिपाठ’ सादर केला. किर्तनसेवा सादर करताना जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा आधार घेत त्यांनी उपस्थित पालकांना आणि तरुणाईला काळानुरूप मौलिक उपदेश केला.
कीर्तनाचे निरूपण करताना हभप कांचनताई म्हणाल्या की,”ज्याप्रमाणे जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर पराक्रमाचे आणि नीतिमत्तेचे संस्कार केले, आजच्या माता-पित्यांनीही तीच जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.” संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील मतितार्थ सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ भौतिक प्रगती म्हणजे जीवन नव्हे, तर चारित्र्यसंपन्न पिढी घडवणे हेच परमार्थाचे आणि समाजाचे खरे यश आहे. मुले उपदेशापेक्षा पालकांच्या अनुकरणातून जास्त शिकतात. त्यामुळे घरात भक्ती आणि शिस्तीचे वातावरण ठेवा. शिवरायांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी त्याग केला, आजच्या तरुणांनी व्यसनांचा त्याग करून स्वराज्याच्या आणि सुराज्याच्या कार्यात हातभार लावावा. शिवरायांचा सर्वात मोठा संस्कार म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान मानणे’. हा विचार आजच्या पिढीच्या रक्तात भिनणे आवश्यक आहे. महाराज प्रत्येक मोहीम नियोजनाने आखत असत, मुलांनीही आपल्या अभ्यासात आणि जीवनात वेळेचे महत्त्व जाणावे.
बुद्धे ले-आउटचा परिसर या कीर्तन सेवेने विठ्ठलनामाच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. ”केवळ शिवजयंती साजरी करणे म्हणजे मिरवणुका काढणे नव्हे, तर शिवरायांचे विचार आचरणात आणून आपल्या पाल्याला ‘संस्कारांचा मावळा’ बनवणे होय, ”असे आवाहन कांचनताईंनी यावेळी केले. किर्तनसेवा सादर करताना मृदगांची उत्कृष्ट साथ हभप राजू भक्ते यांनी तर गायन हभप सूरज, अनिल, नामदेव महाराज व टाळकऱ्यांनी केली. या कार्यक्रमाला मांढळ परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मनीषा फेंडर, सोनू निर्गुळकार व वैष्णवी चव्हाण आदींनी शिवरायांचे चरित्र उलघडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीच्या संपूर्ण मावळ्यांनी सहकार्य केले.






