Home Breaking News अकोला येथे इमारतीचा भाग कोसळला; मनपाकडून धोकादायक भाग हटविण्याची कारवाई

अकोला येथे इमारतीचा भाग कोसळला; मनपाकडून धोकादायक भाग हटविण्याची कारवाई

 

सुदैवाने जीवितहानी टळली; काही रहिवाशांना किरकोळ दुखापत

श्रीकांत पाचकवडे

अकोला : शहरातील राजपुतपुरा परिसरात गोपाल कुटियाजवळ संभव अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या एका इमारतीचा काही भाग रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी ६.१५ ते ६.३० वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत इमारतीतील काही रहिवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

प्रकाश यादव व इतरांच्या मालकीच्या या इमारतीचा काही भाग खचल्याची प्राथमिक माहिती महानगरपालिका प्रशासनाला मिळताच तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. मनपा आयुक्त सुनील लहाने यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे आणि उपायुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचा कमकुवत व धोकादायक भाग हटविण्याची कारवाई करण्यात आली.

 

जखमींवर रुग्णालयात उपचार

 

इमारतीतील काही रहिवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

 

मनपा, अग्निशमन दल आणि पोलिसांची उपस्थिती

या कारवाईवेळी अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे आणि सहायक आयुक्त (पूर्व) राजेश सरप उपस्थित होते. तसेच स्वच्छता विभागप्रमुख प्रशांत राजुरकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष कथले, सहायक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, नगररचना विभागाचे पूर्व क्षेत्रातील कनिष्ठ अभियंते राहुल राऊत व अक्षय बोर्डे यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि मनपाच्या पूर्व झोन कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 

इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात काही काळ हालचाली वाढल्या होत्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने तातडीने धोकादायक भाग हटविण्याची कारवाई केली.

Don`t copy text!