४०० ग्रॅम वजनाचा आणि ३० हजार रुपये किमतीचा मुकुट लंपास; दहीहंडा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
कुशल भगत | OTT News
कुटासा : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा येथील धनगरपुरा परिसरातील प्रसिद्ध मारोती मंदिरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारोतीरायांच्या मूर्तीच्या डोक्यावरील सुमारे ३० हजार रुपये किमतीचा आणि ४०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने लंपास केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकाच्या माहितीने चोरीचा प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मारोती संस्थान धनगरपुरा, ग्राम कुटासा येथील उपाध्यक्ष देविदास महादेवराव घटाळे (वय ७४, रा. कुटासा) यांना गावातील सुनील रामेश्वर लाखे यांनी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेल्याची माहिती दिली.

त्यानंतर घटाळे यांनी तातडीने मंदिरात जाऊन पाहणी केली. यावेळी मारोतीरायांच्या मूर्तीच्या डोक्यावर असलेला चांदीचा मुकुट गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुमारे ४०० ग्रॅम वजनाचा आणि ३० हजार रुपये किमतीचा हा मुकुट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली.
दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी देविदास घटाळे यांच्या तक्रारीवरून दहीहंडा पोलीस ठाण्यात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी अपराध क्रमांक ४८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेला मुकुट अद्याप हस्तगत झालेला नसल्याची माहिती आहे.
चोरट्याचा शोध सुरू
धार्मिक स्थळावरील या चोरीच्या घटनेमुळे कुटासा आणि परिसरातील भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मंदिरातील मुकुट नेमका कोणी आणि कोणत्या परिस्थितीत चोरला, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेऊन चोरीला गेलेला मुकुट हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






