ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; हातात लाठ्या-काठ्या घेऊन रात्रभर पहारा, पोलिसांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
कुशल भगत | दहीहांडा
दहीहांडा : रात्रीची शांतता, आकाशात घिरट्या घालणारे संशयास्पद ड्रोन आणि गावोगावी पसरलेल्या चोरांच्या चर्चांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रीच्या सुमारास आकाशात ड्रोन दिसत असल्याच्या चर्चांना चोरीच्या घटनांची जोड मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे घरांची रेकी करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत का? की हा केवळ अफवांचा फुगवटा आहे? या प्रश्नांमुळे पनोरी, कुटासा आणि परिसरातील गावांमध्ये सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास ड्रोनच्या घिरट्या?
अकोला जिल्ह्यातील पनोरी, कुटासा आणि परिसरातील काही भागांत रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास आकाशात संशयास्पद ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याच्या चर्चांमुळे नागरिकांचा संशय अधिक बळावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून एखाद्या घरावर किंवा शेतावर लक्ष ठेवले जाते आणि त्यानंतर चोरी केली जाते, अशा चर्चा गावागावांत पसरत आहेत. मात्र, ड्रोनचा वापर करून चोरटे रेकी करत असल्याच्या दाव्याला ठोस पुरावा समोर आलेला नसल्याचे सांगितले जात आहे.
हातात लाठ्या-काठ्या, टॉर्च घेऊन ग्रामस्थांचा पहारा!
अफवांमुळे निर्माण झालेल्या भीतीचा परिणाम आता गावातील दैनंदिन जीवनावरही दिसू लागला आहे. संभाव्य चोरी टाळण्यासाठी काही गावांतील तरुण आणि ग्रामस्थ रात्रीच्या वेळी हातात लाठ्या-काठ्या, टॉर्च घेऊन गस्त घालत आहेत. संशयास्पद वाहने किंवा व्यक्ती दिसल्यास त्यांची चौकशी केली जात आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांकडून रस्त्यांवर पहाराही दिला जात असल्याची माहिती आहे. मात्र, केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही अडवणे किंवा कायदा हातात घेणे धोकादायक ठरू शकते.
ड्रोनमागचे रहस्य काय? अफवांमुळे वाढली चिंता
रात्री आकाशात दिसणाऱ्या ड्रोनचा नेमका उद्देश काय, ते कोण उडवत आहे आणि त्याचा चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र, ड्रोन दिसणे आणि चोरी होणे या दोन घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी अधिकृत माहिती आणि पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
पोलिसांचे आवाहन : अफवांवर विश्वास ठेवू नका!
ड्रोनच्या माध्यमातून चोरटे रेकी करत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दहीहांडा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास स्वतःहून कारवाई करण्याऐवजी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. अफवा पसरवू नयेत, कोणत्याही व्यक्तीला केवळ संशयावरून त्रास देऊ नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ड्रोनच्या घिरट्यांमागचे सत्य तपासातूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत अफवांपासून सावध राहणे, सतर्कता बाळगणे आणि पोलिसांना सहकार्य करणे, हाच नागरिकांसाठी योग्य मार्ग आहे.






