Home Breaking News वान अभयारण्यात गोवंश तस्करीचा डाव उधळला! चार बैलांसह दोघे वनविभागाच्या जाळ्यात

वान अभयारण्यात गोवंश तस्करीचा डाव उधळला! चार बैलांसह दोघे वनविभागाच्या जाळ्यात

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात कारवाई; उत्तर नागरतास बिटमध्ये अवैध वाहतूक उघड

 

कुशल भगत | OTT News

 

अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वान अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविभागाने धडक कारवाई केली. उत्तर नागरतास बिटमध्ये रचलेल्या सापळ्यात दोन जणांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून चार बैल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अभयारण्य क्षेत्रातील अवैध हालचालींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

वनपरिक्षेत्र अधिकारी एस. ए. आंबेकर यांना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह वान अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील उत्तर नागरतास बिट, वनखंड क्रमांक १२५६ येथे गस्त घातली. यावेळी दोन व्यक्ती चार बैलांची अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आल्या. वनविभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर संबंधित वाहतूक अवैध असल्याचे निष्पन्न झाल्याचे वनविभागाने सांगितले.

 

कोण आहेत ताब्यात घेतलेले आरोपी?

 

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गणेश अंतरसिंग भुयटे (वय ३७, रा. चंदनपूर, ता. तेल्हारा, जि. अकोला) आणि अंतरसिंग नारसिंग आहोर्या (वय ४८, रा. दिवानझरी, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे.

 

दोघांविरुद्ध वनगुन्हा क्रमांक ०३/२०२६, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार बैल जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

कोणत्या कायद्यांनुसार कारवाई?

 

या प्रकरणात भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१)(अ), २६(१)(फ) व ५२ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम २७, २९, ३१ आणि ५१(१-सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

ही कारवाई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक चंद्रशेखर बाला, अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया आणि सहाय्यक वनसंरक्षक जी. पी. टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या मोहिमेत वनरक्षक सतीश देशमाने, कु. प्रमिला जावरकर (उत्तर नागरतास बिट), थोटे तसेच इतर क्षेत्रीय कर्मचारी सहभागी झाले होते.

 

वनविभागाचे नागरिकांना आवाहन

 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांसह इतर वन्यजीवांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अभयारण्य क्षेत्रात अनधिकृत प्रवेश, अवैध वनचराई आणि गोवंशाची अवैध वाहतूक करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

वनक्षेत्रात कोणताही संशयास्पद किंवा अवैध प्रकार आढळल्यास नागरिकांनी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वान वन्यजीव परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

OTT News | अकोट

Don`t copy text!