चार लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदखाँ प्लॉट परिसरातील एका घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ७ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून छापा
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्ह्यातील अवैध जुगारावर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध जुगाराविरोधात कारवाई करण्यासाठी शहरात गस्त घालत होते.
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी चांदखाँ प्लॉट परिसरातील एका घरात काही जण पैशांची हार-जीत लावून जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी १३ जण जुगार खेळताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
१३ जणांवर कारवाई; साहित्य जप्त
या कारवाईत अरबाज खान हुसेन खान, मोहम्मद राहील मोहम्मद अकील, शेख करीम शेख इब्राहिम ऊर्फ कल्लू काटा, शेख इमरान शेख इब्राहिम, शेख जुबेर शेख इब्राहिम, मोहसीन खान जहीर खान, शेख शकील शेख जलील, मोहम्मद नवेद अब्दुल हमीद, इरशाद खान शकील खान, सुमित सुखदेव कांबळे, शेख सुमेर शेख लाला, विजय सुरेश गलांडे आणि अब्दुल रहमान अब्दुल हकीम या १३ जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णू बोडखे, माजिद पठाण, अनिल चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार आणि चालक सहभागी झाले होते.
‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अवैध धंद्यांविरोधातील कारवाया सुरू असल्याने शहरातील बेकायदा जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.






