Home Breaking News अकोला जिल्हा परिषदेत ‘नशा मुक्त भारत सप्ताह’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात

अकोला जिल्हा परिषदेत ‘नशा मुक्त भारत सप्ताह’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात

नशा मुक्त भारत अभियान
नशा मुक्त भारत अभियान
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या नशा मुक्त भारत अभियान (NMBA) अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त १७ ते २६ जून २०२६ या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या ‘नशा मुक्त भारत सप्ताहा’ अंतर्गत अकोला जिल्हा परिषदेत जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध प्रबोधनकार व सप्त खंजिरी वादक ह.भ.प. सत्यपाल महाराज उपस्थित होते. यावेळी ह.भ.प. विठ्ठल महाराज खापरकर व ह.भ.प. गजानन महाराज चिंचोलकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
सत्यपाल महाराज यांनी आपल्या ओघवत्या, विनोदी आणि प्रभावी शैलीत व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, मादक पदार्थांच्या विळख्यातून दूर राहण्याचे महत्त्व, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीची गरज यावर प्रभावी प्रबोधन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक विचारांची जागृती निर्माण झाली.
यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने ‘नशा मुक्त भारत सप्ताह’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यात रॅली, युवक मेळावे, मानवी साखळी, जनसंवाद, शपथविधी, शाळा-महाविद्यालयांमधील मार्गदर्शन सत्रे, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच ऑनलाइन-ऑफलाइन जनजागृती मोहिमा यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जवंजाळ, सहायक प्रशासन अधिकारी भारती देशमुख, योगेश बोदडे, विजय धाडवे, हिंगणे, शैलेश लव्हाळे, भांडारपाल देवनाथ गुट्टे, पत्रकार कमलपुत्र शिरसाट तसेच व्यसनमुक्ती जनजागृती अभियानात सक्रिय असलेले अमरदीप सदाशिव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी, बांधकाम आदी विभागांतील कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आडे यांनी केले, तर शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
“नशामुक्त भारत – विकसित भारताची ओळख” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणारा हा जनजागृती कार्यक्रम उत्साह, सहभाग आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला.
Don`t copy text!