श्रीकांत पाचकवडे
अकोला : बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक वातावरणात नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असून, त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षण घेणारे अधिकारी केवळ प्रशिक्षणार्थी न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून विकसित व्हावेत आणि नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
परळ येथील Na. Me. Lokhande Maharashtra Labour Science Institute यांच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री फुंडकर म्हणाले की, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा आणि उद्योगांच्या प्रगतीमध्ये विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी संवेदनशीलता, कार्यक्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडणे आवश्यक आहे.
नवीन कामगार संहितांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अधिकारी वर्गाने पुढाकार घ्यावा. बदलत्या कायदेशीर तरतुदींची सखोल माहिती आत्मसात करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेच्या संचालक Roshni Kadam-Patil यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करत अधिकारी वर्गाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. राज्यातील विविध विभागांतील कामगार अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश अधोरेखित झाला. कार्यक्रमाचे आयोजन ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले.





