Home Breaking News कार्मेल शाळेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर ५ ते १० किलोचे दप्तर; १० टक्के नियमाला...

कार्मेल शाळेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर ५ ते १० किलोचे दप्तर; १० टक्के नियमाला हरताळ

मनसेची वजनकाटा घेऊन पाहणी; नियम न पाळणाऱ्या शाळांना आंदोलनाचा इशारा

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असा शासनाचा निकष असतानाही अकोला शहरातील काही शाळांमध्ये या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. कार्मेल शाळेत मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट वजनकाटा घेऊन केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन ५ ते १० किलोपर्यंत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि शहराध्यक्ष सौरभ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे प्रत्यक्ष वजन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन ५ ते ६ किलो, तर काहींचे वजन तब्बल १० किलोपर्यंत असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष?

शालेय शिक्षण विभागाच्या दप्तराच्या वजनासंदर्भातील नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे वजन मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पुस्तके, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य दररोज शाळेत आणावे लागत असल्याने विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ओझे पडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

दप्तराचे वाढते वजन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते, त्यामुळे शाळा व्यवस्थापनांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

अनावश्यक पुस्तके-वह्यांची सक्ती थांबवा

 

कार्मेल शाळा प्रशासनासह अकोला जिल्ह्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तातडीने कमी करावे. वेळापत्रकाचे योग्य नियोजन करून दररोज आवश्यक तेवढीच पुस्तके व वह्या विद्यार्थ्यांनी आणाव्यात, तसेच अनावश्यक साहित्याची सक्ती करू नये, अशी मागणी मनसेने केली.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने प्रशासनानेही या प्रकाराची दखल घेऊन आवश्यक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

या पाहणी मोहिमेत जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत यांच्यासह अमोल भेंडारकर, मोहन अंभोरे, हर्षल अंभोरे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!