Home Breaking News शेतकरी संकटात, विद्यार्थ्यांवर फीचा बोजा कशाला? दहावी-बारावीची परीक्षा फी माफ करा :...

शेतकरी संकटात, विद्यार्थ्यांवर फीचा बोजा कशाला? दहावी-बारावीची परीक्षा फी माफ करा : शत्रुघ्न बिडकर

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची शत्रुघ्न बिडकरांची मागणी

 

श्रीकांत पाचकवडे

 

अकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही बसू नये, यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा फी माफ करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी केली आहे.

 

यासंदर्भात बिडकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

 

परीक्षा अर्ज भरण्याच्या काळातच दुष्काळाचे संकट

 

सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

शेतीतील उत्पन्नावर परिणाम झाल्याने अनेक कुटुंबांसमोर दैनंदिन खर्चासह मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत आहे.

 

शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

 

दुष्काळग्रस्त जिल्हे व विभागांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा फी शासनाने तातडीने माफ करावी, अशी मागणी शत्रुघ्न बिडकर यांनी केली आहे.

 

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, तसेच केवळ आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज असल्याचे बिडकर यांनी म्हटले आहे.

 

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

 

दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक संकटातून काहीसा दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे बिडकर यांनी निवेदनातून नमूद केले आहे.

 

शासनाने या मागणीचा तातडीने विचार करून दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Don`t copy text!