विजयादशमी :OTT विशेष
दरवर्षी आपण रावणाचा भलामोठा पुतळा उभा करतो, फटाक्यांच्या आवाजात तो जळताना पाहतो, टाळ्या वाजवतो आणि घरी परततो. पण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र उघडताच पुन्हा अत्याचार, हिंसा, फसवणुकीच्या बातम्या दिसतात. मग प्रश्न पडतो, रावण खरंच जळाला का?
लहानपणीचा दसरा आठवतो. आई आपट्याची पाने आणायला सांगायची. आम्ही खिसे भरून पाने घ्यायचो आणि “सोनं घ्या, सोन्यासारखं राहा” म्हणत घरोघरी वाटायचो. आजीच्या पायांवर पान ठेवून नमस्कार केला की तिचा थरथरता हात डोक्यावर यायचा आणि खिशात खडीसाखर पडायची. रावणदहनाच्या वेळी वडिलांच्या खांद्यावर बसून मी आजीला विचारायचो, “आजी, आता सगळं वाईट संपलं ना?” ती हसून म्हणायची, “बाळा, पुतळा जळतो रे, रावण नाही. तो जाळायला स्वतःचा हात लागतो.” तेव्हा न कळलेला अर्थ आज उमगतो; पण वडिलधाऱ्यांशी चार शब्द बोलायलाही आपल्याकडे वेळ आहे का?
विजयादशमी हा विजयाचा आणि कृतज्ञतेचा सण आहे. अश्वांसारख्या सजीवांपासून शस्त्रे, यंत्रे, वाहने आणि अवजारांपर्यंत विजय मिळवून देणाऱ्या साधनांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो. शमीवृक्षाचे पूजन करतो, आपट्याची पाने सोने मानून देवाला वाहतो आणि आप्तेष्टांना देत थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतो. या परंपरांमागे मंगलभाव आणि परस्परांविषयीचा आदर दडलेला आहे.
“आता कुठे लढाया उरल्या आहेत?” असा प्रश्न काहीजण विचारतील. पण लढाया केवळ रणांगणावरच होतात का? नोकरी, व्यवसाय आणि समाजजीवनातील आव्हानांसोबतच काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षड्रिपूंशीही आपली लढाई सुरू असते. दुसऱ्याला हरवण्यापेक्षा स्वतःतील दोषांवर विजय मिळवणे अधिक कठीण असते.
समाजाकडे पाहिले तर रावणाच्या दहा शिरांप्रमाणे दहा जखमा दिसतात : मुलींवरील अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि वृद्धांचा अपमान. मुलीच्या मनातील भीती, कामाच्या ठिकाणी स्त्रीला सहन करावा लागणारा छळ आणि घरात दडपला जाणारा हुंदका ही त्याचीच रूपे आहेत.
दाखवण्यासाठी आपण दरवर्षी हा रावण जाळतो ।
आपण आपल्याच मनात एक दुष्ट रावण पाळतो ॥
असूया, द्वेष, विकृत वासना, पैशाचा हव्यास आणि अहंकार या रूपांत रावण आजही जिवंत आहे. दुसऱ्याच्या यशाने जळफळणे, रागाच्या भरात कटू बोलणे, पैशासाठी नियम वाकवणे किंवा “मीच बरोबर” असा हट्ट धरणे, हा आपल्या मनातील रावणच नाही का? स्वतःला प्रामाणिकपणे विचारून पाहा.
मनातील रावण जाळणे म्हणजे स्वतःच्या दोषांवर मात करणेच नव्हे, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणेही होय. दुर्बल व्यक्तीवर अन्याय होत असताना गप्प बसणे म्हणजे अन्यायाला बळ देणे. पीडिताला साथ देणे आणि अन्याय करणाऱ्याला योग्य मार्गाने विरोध करणे, हेच आजच्या काळातील खरे रावणदहन आहे.
मागचे नऊ दिवस आपण जगन्मातेची उपासना केली. एकनाथ महाराजांच्या जोगव्यातील ओळी आपण आरतीत म्हटल्या :
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ॥
दंभ सोडणे, मनोविकार दूर करणे आणि ज्ञानाला अहंकाराचा स्पर्श होऊ न देणे, हा या शिकवणीचा गाभा आहे. आरती म्हणणे सोपे; पण तिची शिकवण आचरणात आणणे अवघड. गरजूंना मदत करणे, एकाकी ज्येष्ठांची विचारपूस करणे आणि दुःखी माणसाला आधार देणे, यातूनच भक्ती कृतीत उतरते.
सीमोल्लंघन म्हणजे केवळ गावाची वेस ओलांडणे नव्हे. तरुणाईने शिक्षण आणि प्रगतीसाठी घराच्या, गावाच्या कम्फर्ट झोनची सीमा ओलांडावी; त्याचबरोबर सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या अहंकारापासूनही दूर व्हावे. मोठ्या शहरात स्थिरावलेल्या मुलाने गावाकडील आई-वडिलांचा हात सोडू नये. जात, धर्म आणि आर्थिक स्थितीच्या भिंती ओलांडून माणुसकी जपावी.
सणाचा आनंद केवळ सजावट आणि जल्लोषापुरता मर्यादित न ठेवता गरजूंना मदत करून, पर्यावरणाची काळजी घेऊन आणि नात्यांतील जिव्हाळा जपून तो अधिक अर्थपूर्ण करू या. आपट्याची पाने देताना “सोनं घ्या, सोन्यासारखं राहा” म्हणतो, त्या शुभेच्छा आपल्या कृतीतूनही खऱ्या करू या.
यंदा रावणाच्या पुतळ्याबरोबर मनातील असूया, द्वेष आणि अहंकारही जाळण्याचा संकल्प करू या. अन्यायाविरुद्ध उभे राहू, माणुसकी जपू आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करू.
रावणाचा पुतळा जाळणे ही परंपरा आहे; पण मनातील रावण जाळणे ही खरी साधना आहे. ज्या दिवशी आपण स्वतःतील वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवू, त्याच दिवशी विजयादशमीचा खरा अर्थ साकार होईल. तेच खरे सीमोल्लंघन!

— पंकज वसंत पाटील
मलकापूर, जि. बुलढाणा
मो.9850430579






