Home Breaking News Akola : अकोल्यात उद्या ५१ फुटी रावणाचे रिमोट कंट्रोलद्वारे दहन!

Akola : अकोल्यात उद्या ५१ फुटी रावणाचे रिमोट कंट्रोलद्वारे दहन!

Akola : तापडिया नगर युवाशक्ती नवदुर्गा मंडळाचा २० वर्षांचा सांस्कृतिक वारसा; आतषबाजी ठरणार आकर्षण

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय अधोरेखित करणारा रावण दहन सोहळा अकोल्यात यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. तापडिया नगर युवाशक्ती नवदुर्गा मंडळाच्या वतीने मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, तापडिया नगर येथे ५१ फुटी रावणाचे रिमोट कंट्रोलद्वारे दहन करण्यात येणार आहे.

 

माजी नगरसेवक सागर शेगोकार यांच्या पुढाकारातून गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. नव्या पिढीला रामायणाचे महत्त्व समजावे, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन व्हावे, तसेच सत्य, न्याय आणि सदाचाराचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

 

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, जयंत मसने आणि किशोर मागटे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

३०० युवकांकडे आयोजनाची जबाबदारी

 

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सुमारे ३०० युवकांची टीम सज्ज झाली आहे. बालक आणि महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आकर्षक आतषबाजी हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असेल. नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

 

माजी नगरसेवक सागर शेगोकार यांच्यासह अंकुश देशमुख, अमित फोकमारे, निखिल देशमुख, हरीश काळे, धनराज अहिर, सचिन झाडोकार, उल्हास निवाने, गणेश तायडे, धीरज पटेल, भावेश सोळंकी, गोपाल सोनोने, प्रतीक जयस्वाल, ओम कुचके, विठ्ठल कुचके, गोटू हिवराळे, मनोज ढगे, निशांत मानकर, नरेंद्र साठे, सुमित ठाकूर, चंद्रकांत दांदळे, पुरुषोत्तम वानखडे, पुरुषोत्तम उगले आदी कार्यकर्ते आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

 

परिसरातील नागरिकांची उत्सुकता

 

उमरी, तापडिया नगर, रामदास पेठ, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, जवाहर नगर, न्यू तापडिया नगर, देशमुख फाईल आणि खरप परिसरातील नागरिक दरवर्षी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही रावण दहन आणि आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे.

 

रावण दहनातून वाईट प्रवृत्तींचा त्याग, सत्याचा स्वीकार आणि समाजात सद्भावना रुजविण्याचा संदेश देणारा हा सोहळा अकोलेकरांसाठी सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.

Don`t copy text!